पाथर्डी (तालुका प्रतिनिधी)
सोशल मीडियावर रील बनवून प्रसिद्धी मिळविणारेच लुटारू निघाल्याचा धक्कादायक प्रकार पाथर्डी तालुक्यातील शेकटे फाट्याजवळ घडल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. पाथर्डी-कोरडगाव रस्त्यावर दुचाकीने प्रवास करणाऱ्या मायलेकांना दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी अडवून मारहाण केली. त्यानंतर आईच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातील सोन्याचे दागिने, नऊ हजार रुपयांची रोकड आणि मित्राची दुचाकी असा एकूण ६९ हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने नेल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सुजित चौधर, कोमल काळे आणि अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध फिर्याद देण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, तिसगाव येथील दीपक योसेफ गरुड (वय २३) हा टेम्पोचालक असून, तो आई मैना गरुड यांच्यासोबत गुरुवारी (दि. २२) सायंकाळी सोनोशी येथे मावशीच्या घरी जाण्यासाठी निघाला होता. त्याच्या आईने अॅक्सिस बँकेकडून घेतलेल्या कर्जातील सात हजार रुपये काढून घरी आणले होते. हे पैसे सोबत घेऊन मायलेक मित्राच्या ड्रीम युगा दुचाकीवरून प्रवास करीत होते.
रात्री साडेआठच्या सुमारास त्यांची दुचाकी शेकटे फाट्याजवळ आली असता, मागून आलेल्या पल्सर दुचाकीवरील पुरुष आणि महिलेने त्यांना रस्त्यात आडवे वाहन लावून थांबविले. त्याचवेळी दुसऱ्या दुचाकीवरून आणखी दोघे तेथे आले. त्यानंतर चौघांनी मायलेकांना दुचाकीवरून खाली उतरविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी दीपक याने पल्सरवरील पुरुष व महिलेला सोशल मीडियावरील रीलमधून ओळखत असल्याचे सांगितले. त्याने त्यांची नावे सुजित चौधर आणि कोमल काळे अशी नमूद केली आहेत. यानंतर कोमल काळे हिने आई मैना गरुड यांच्या पर्समधील सात हजार रुपये काढून घेतले. तसेच त्यांना पकडून गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि कानातील सोन्याची फुले काढून घेतल्याचा आरोप आहे.दरम्यान, सुजित चौधर याने दीपकच्या तोंडावर दोन ते तीन चापटा मारून त्याच्या खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले. अन्य दोन अनोळखी व्यक्तींनी दीपकला पकडून ठेवल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर चौघांनी मित्राची ड्रीम युगा दुचाकीही घेऊन घटनास्थळावरून पलायन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
घटनेनंतर दीपक याने तातडीने डायल ११२ वर संपर्क साधला. काही वेळात पाथर्डी पोलिसांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर मायलेक पोलिसांसोबत पोलीस ठाण्यात आले. मारहाणीत दोघांनाही मुक्का मार लागल्याने दवाखान्यात जाण्याची गरज असल्याचे दीपक याने फिर्यादीत नमूद केले आहे.या घटनेत सात हजार रुपये आईकडील रोकड, दोन हजार रुपये फिर्यादीकडील रोकड, अंदाजे २० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र, २० हजार रुपयांची सोन्याची फुले आणि २० हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण ६९ हजार रुपयांचा ऐवज गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.सोशल मीडियावरील रीलमधून ओळख पटलेल्या व्यक्तींवरच लुटमारीचा आरोप झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
शेवगाव-पाथर्डी परिसरासह जिल्ह्यातील एसटी बसमध्ये महिला प्रवाशांच्या पर्समधून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या कोमल नागनाथ काळे आणि तिचा साथीदार सुजित राजेंद्र चौधर या दोघांना यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ९ लाख ३५ हजार २३० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला होता. कोमल ही सोशल मीडियावर रीलस्टार म्हणून प्रसिद्ध असून, तिचे सुमारे ६० हजार फॉलोअर्स असल्याची माहिती समोर आली होती. तपासादरम्यान या दोघांनी एसटी बसमधील महिला प्रवाशांना लक्ष्य करून चोरी केल्याचे उघड झाले होते. आता २२ ऑक्टोबर रोजी पुन्हा लुटीचा गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाला नव्याने महत्त्व प्राप्त झाले आहे.




