मनमाड | प्रतिनिधी
शहरात दहशत माजविण्यासाठी एका समाजकंटकाने धुमाकूळ घालत वेगवेगळ्या भागातील ६ मोटर सायकली पेटवून दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दुचाकी पेटविताना हा समाजकंटक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने त्या आधारे पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तरुणाने हे कृत्य का केले आणि त्याच्या सोबत आणखी कोण होते याचा पोलीस तपास करीत आहे. दरम्यान, सदर समाजकंटकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी त्याच्याकडून आमची झालेली नुकसान भरपाई वसुल करून देण्यात यावी अशी मागणी दुचाकी मालकांनी केली आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार रोहित जगताप (वय २८रा. विवेकानंद नगर) या तरुणाने सर्व प्रथम डॉ. आंबेडकर चौकात दीपक खरे यांनी त्यांच्या घरा बाहेर उभी केलेली दुचाकी पेटवून दिली. रात्री येऊन अगोदर दुचाकीच्या पेट्रोल टाकीचा पाईप काढून पेट्रोल खाली सांडल्या नंतर काडी लावून आग लावल्यानंतर तो फरार झाला. आगीत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली. नंतर त्याने शहरातील वेगवेगळ्या ६ भागात जाऊन घरा बाहेर उभी करून ठेवलेल्या दुचाकी पेटवून दिल्यानंतर फरार झाला होता. दुचाकी पेटविताना रोहित जगताप एका ठिकाणी सीसीटीव्हीत कैद झाला त्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली. विशेष म्हणजे या तरूणाने ज्यांच्या दुचाकी पेटवून दिल्या त्यांच्या सोबत त्याचं कोणतंही भांडण देखील नाही त्यामुळे त्याने दुचाकी का पेटविल्या याचा शोध पोलिसांतर्फे घेतला जात आहे