अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महानगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण केलेल्या विकासकामाचे प्रलंबित बिल मिळवून देण्यासाठी 75 हजार रुपयांची लाच स्वीकारणार्या समाजकल्याण विभागाच्या निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (12 नोव्हेंबर) रंगेहाथ पकडले. संदीप हरिभाऊ फुंदे (वय 42) असे पकडण्यात आलेल्या निरीक्षकाचे नाव आहे. सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय येथे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील तक्रारदार हे शासकीय ठेकेदार म्हणून काम करतात. अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील केडगाव येथील महानगरपालिकेच्या जागेवर संत रोहिदास विकास केंद्र उभारण्याचे काम त्यांना देण्यात आले होते. महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 13 फेब्रुवारी 2024 रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. त्यानुसार ठेकेदाराने संबंधित काम पूर्ण केले होते.
या कामाच्या बिलापोटी ठेकेदाराला आतापर्यंत 25 लाख रुपये मिळाले आहेत. मात्र, उर्वरित 24 लाख 80 हजार 984 रुपयांची रक्कम अद्याप प्रलंबित होती. या निधीच्या मागणीसंदर्भात अहिल्यानगर महानगरपालिकेकडून समाजकल्याण विभागाकडे पत्रव्यवहारही करण्यात आला होता. दरम्यान, 5 नोव्हेंबर रोजी समाजकल्याण निरीक्षक संदीप फुंदे याने ठेकेदाराला फोन करून कार्यालयात भेटण्यासाठी बोलावले. त्यानुसार ठेकेदाराने त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी फुंदे याने पूर्ण केलेल्या कामाच्या प्रलंबित दायित्व निधीबाबत मंत्रालयात प्रस्ताव सादर केल्याचे सांगितले. मंत्रालयातून निधी मागविण्यासाठी तसेच निधी प्राप्त झाल्यानंतर कार्यालयीन पुढील कार्यवाही करून ठेकेदाराला रक्कम मिळवून देण्यासाठी 75 हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली.
या लाच मागणीबाबत ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहिल्यानगर कार्यालयाकडे तक्रार केली. त्यानंतर गुरुवारी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयात लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. या वेळी फुंदे याने पंचांसमक्ष 75 हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. तसेच मागणी केलेली रक्कम स्वीकारण्याची तयारीही त्यांनी दर्शविली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याच कार्यालयात सापळा रचला. या कारवाईदरम्यान फुंदे यांनी तक्रारदाराकडून पंचांसमक्ष 75 हजार रुपये स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.




