Friday, November 15, 2024
Homeमहाराष्ट्रबंडखोरी आणि ‘ट्रम्पेट’ चिन्हाचे आव्हान महाविकास आघाडीला मारक ठरणार?

बंडखोरी आणि ‘ट्रम्पेट’ चिन्हाचे आव्हान महाविकास आघाडीला मारक ठरणार?

पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाचं केंद्रस्थान आणि मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेला सोलापूर जिल्हा हा साखरेचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. याशिवाय, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून या जिल्ह्याची ओळख होती. मात्र, भाजपने गत निवडणुकीत जिल्ह्यात वर्चस्व मिळवले आहे. त्यामुळे, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापूर जिल्ह्यीताल 11 विधानसभा मतदारसंघातील लढती निश्चित झाल्या असून माढा, बार्शी, सोलापूर दक्षिण, माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला मतदारसंघात चुरशीच्या लढती होत आहेत.

लोकसभा निवडणुकानंतर सोलापूर जिल्ह्यात अत्यंत चुरस पाहायला मिळाली. त्यामध्ये, भाजपच्या दोन्ही विद्यमान खासदारांचा पराभव करत महाविकास आघाडीने जिल्ह्यातील माढा आणि सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला. त्यामुळे, विधानसभा निवडणुकांमध्येही मोठी रंगत आली आहे. मात्र, पंढरपूर, सांगोला आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये झालेली बंडखोरी त्याचा जिल्ह्यातील इतर मतदार संघावर होणारा परिणाम आणि शरद पवार गटाच्या सहा उमेदवारांसमोर तुतारीसदृश ट्रम्पेट चिन्ह घेऊन उभे असलेले उमेदवार यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता आहे. सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात सलग चारवेळा निवडून आलेले भाजपचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची त्यांचे पारंपरिक विरोधक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महेश कोठे यांच्यात लढत होत आहे. भाजपमधून माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी बंडखोरी केली आहे. मात्र त्याचा फारसा परिणाम होणार नसल्याचे चित्र आहे तर कोठे कॉँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस असा प्रवास करत तीन वेळा पराभूत झाले आहेत. त्यामुळे देशमुखांना फारसा फटका बसणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रतिनिधित्व केलेल्या सोलापूर मध्य मतदारसंघामध्ये चौरंगी लढतीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. भाजपकडून देवेंद्र कोठे तर महाविकास आघाडी कडून कॉँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे हे एकमेकांसमोर समोर ठाकले आहेत. मात्र, 2019 च्या निवडणुकीत दुसर्‍या क्रमांकाची मते घेणारे एमआयएमचे फारूक शाब्दी पुन्हा रिंगणात आहेत तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते नरसय्या आडम यांना उमेदवारी न दिल्याने ते नाराज आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. दक्षिण सोलापूर मतदार संघात महायूतीचे उमेदवार माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख(भाजप) यांचा सामना अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी आणि महाविकास आघाडीचे अमर पाटील(शिवसेना ऊबाठा) यांच्याशी होत आहे. तर कॉँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मौलाली उर्फ बाबा मिस्त्री हे प्रहार संघटनेकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी 2019 मध्ये 54 हजार मते घेतली होती. कॉँग्रेसने उमेदवारी नाकारलेले माजी आमदार दिलीप माने यांनी काडादी यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे या मतदार संघातील लढत ही अत्यंत चुरशीची होणार आहे.

अक्कलकोट मतदार संघात महायूतीकडून भाजपचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि महाविकास आघाडीकडून कॉँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे हे पारंपरिक विरोधक पुन्हा एकदा समोरासमोर उभे ठाकले आहेत. या दोन्ही नेत्यांना मागीलवेळी मदत करणार्‍या नेत्यांमध्ये बदल झाल्याने या मतदार संघातही चुरस वाढली आहे. मोहोळ मतदार संघात महायूतीकडून आमदार यशवंत माने (राष्ट्रवादी कॉँग्रेस) तर महाविकास आघाडीकडून उद्योजक राजू खरे हे रिंगणात आहेत. भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसमसध्ये प्रवेश केलेले संजय क्षीरसागर यांना पवारांनी डावलल्याने ते अपक्ष लढत आहेत. या मतदार संघात माजी आमदार राजन पाटील यांचे वर्चस्व असून ते सध्या अजित पवार गटात आहेत त्यामुळे त्यांच्या ताकदीचा उपयोग महायुतीचे माने यांना कसा होऊ शकतो यावर विजयाची गणिते अवलंबून आहेत. मराठा समाजाची भूमिकाही या मतदार संघात महत्वाची ठरणार आहे.

बार्शी मतदार संघात अपक्ष म्हणून निवडून आलेले आणि नंतर भाजपत गेलेले आमदार राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यात लढत होत आहे. राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष बघता या मतदार संघातही मराठा समाजाची भूमिका महत्त्वाची असणार आहे. करमाळा मतदार संघात अजित पवार गटाचे असलेले अपक्ष आमदार संजय शिंदे हे दुसर्‍यांदा अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे दिग्विजय बागल तर महाविकास आघाडीकडून 2019 मध्ये शिवसेनेकडून लढलेले माजी आमदार नारायण पाटील (राष्ट्रवादी शरद पवार गट) हे लढत देत आहेत. नारायण पाटील यांना मोहिते पाटील कुटुंबियांनी ताकद लावली आहे तर बागल हे किती मते घेतात यावर शिंदेंचे भवितव्य अवलंबून आहे.
माढा मतदारसंघाचे तब्बल सहा वेळा प्रतिनिधित्व करणारे बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यंदा अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातर्फे पंढरपूर येथील विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या मीनल साठे रिंगणात आहेत. ही लढत जरी दोन्ही राष्ट्रवादी आणि एक अपक्ष अशी असली तरी यातील प्रतिष्ठा, अस्तित्व आणि वर्चस्वाची लढाई मात्र बबनराव शिंदे आणि मोहिते पाटील यांच्यात असल्याची चर्चा मतदारसंघात आहे.

माळशिरस मतदार संघात यंदाची लढत लक्षवेधी ठरणार आहे. या मतदार संघामध्ये विद्यमान आमदार राम सातपुते हे महायुतीचे उमेदवार आहेत तर त्यांच्यासासमोर महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर यांचे आव्हान आहे. गेल्यावेळी मोहिते पाटील यांच्या पाठिंब्यामुळे राम सातपुते यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला होता. यावेळी मात्र मोहिते पाटलांनी भाजपची साथ सोडत शरद पवारांची साथ दिल्याने चुरस निर्माण झाली आहे. पंढरपूर मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे महाविकास आघाडीचे अनिल सावंत आणि कॉँग्रेसचे भगीरथ भालके यांच्यात लढत होत आहे. मनसेकडून दिलीप धोत्रे हेही रिंगणात आहेत. समाधान आवताडे यांना प्रशांत परिचारक यांचा पाठिंबा मिळाल्याने आवताडे यांचे पारडे जड झाले आहे.

सांगोला मतदार संघात शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांना शेकापचे स्व. गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख आणि महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे दीपक साळुंखे यांचे आव्हान आहे. गेल्यावेळी दीपक साळुंखे यांनी शहाजीबापू पाटील यांना निवडून आणण्यासाठी साळुंखे यांनी मदत केली होती त्यामुळे देशमुख यांचा निसटता पराभव झाला होता. त्यामुळे ही लढतही चुरशीची आणि लक्षवेधी होणार आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांसामोर ट्रम्पेट चिन्हाचे आव्हान
सोलापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत अकरापैकी सहा जागा लढविणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) सर्व उमेदवारांपुढे तुतारीसदृश ट्रम्पेट चिन्ह घेऊन अन्य उमेदवार उभे आहेत. सामान्य मतदारांची या चिन्हामुळे मोठी फसगत होत असल्याने अगोदरच सर्वच मतदारसंघात झालेली बंडखोरी, वाढलेले उमेदवार आणि त्यात पुन्हा या ट्रम्पेटफ चिन्हाने घातलेल्या गोळाने सोलापुरात शरद पवार गटाच्या सर्व उमेदवारांना घोर लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने केलेली विनंती मान्य करून निवडणूक आयोगाने ट्रम्पेट चिन्हाचे तुतारी हे मराठी भाषांतर रद्द केले आहे. लोकसभा निवडणुकीत ट्रम्पेट चिन्हाचे मराठी भाषांतर तुतारी असे झाल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हा संभ्रम टाळण्यासाठी ट्रम्पेटचे तुतारी हे मराठी भाषांतर रद्द करण्याची मागणी पक्षाने केली होती. ही मागणी मान्य झाल्यामुळे पक्षाला दिलासा मिळाला खरा; परंतु विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांना त्यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाशिवाय तुतारीसदृश ट्रम्पेट चिन्ह घेऊन उभे राहिलेल्या उमेदवारांचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

मोहोळ राखीव मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राजू खरे हे उमेदवार पक्षाचे अधिकृत चिन्ह घेऊन उभे आहेत. परंतु त्यांच्या विरोधात अनिल नरसिंह आखाडे हे अपक्ष उमेदवार तुतारीसदृश ट्रम्पेट चिन्ह घेऊन उभे आहेत. माळशिरसमध्ये याच पक्षाचे उत्तम जानकर यांच्या विरोधात गणेश अंकुश नामदास या अपक्ष उमेदवाराने ट्रम्पेट हे तुतारीसदृश चिन्ह घेतले आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते, आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांचा पुतण्या अनिल सुभाष सावंत हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून भविष्य आजमावत आहेत. याशिवाय काँग्रेसचे भगीरथ भारत भालके यांचीही उमेदवारी कायम आहे. त्याचा फटका भालके यांना बसण्याची चिन्हे दिसत असतानाच त्यांच्याच पक्षाचे चिन्हसदृश ट्रम्पेट चिन्ह घेऊन पंकज देवकाते यांनी रासपकडून उमेदवारी आणली आहे.
माढ्यामध्ये ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बडे साखरसम्राट अभिजित पाटील यांचे तगडे आव्हान आहे. परंतु त्यांच्या पक्षाच्या चिन्हाच्या सदृश ट्रम्पेट चिन्ह घेऊन राजेश तानाजी खरे हे उमेदवार उभे आहेत. त्याचा फटका पाटील यांना कितपत बसतो, याचे उत्तर निवडणूक निकालानंतरच समोर येणार आहे.

शेजारच्या करमाळा मतदारसंघात विद्यमान अपक्ष आमदार संजय विठ्ठलराव शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार नारायण पाटील यांचे आव्हान आहे. परंतु अन्य उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या चिन्हसदृश ट्रम्पेट चिन्ह घेऊन उभे राहिलेले अशोक ज्ञानदेव वाघमोडे (न्यू राष्ट्रीय समाज पार्टी) यांच्या उमेदवारीमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता दिसून येते. सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने महेश विष्णुपंत कोठे यांना संधी दिली आहे. परंतु कोठे यांना जुबेर सलीम पटेल या अपक्ष उमेदवाराच्या ट्रम्पेट चिन्हाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत ट्रम्पेट चिन्हाचे तुतारी हे मराठी भाषांतर रद्द करण्यात आले, तरी प्रत्यक्षात चिन्हसदृशतेमुळे मतदारांमध्ये संभ्रम संपूर्णपणे दूर होण्याची शक्यता धूसर असल्याची भीती राष्ट्रवादीच्या वर्तुळात व्यक्त होत आहे. अगोदरच सर्वच मतदारसंघात झालेली बंडखोरी, वाढलेले उमेदवार आणि त्यात पुन्हा या ट्रम्पेट चिन्हाने सोलापुरातील शरद पवार गटाच्या सर्व उमेदवारांना घोर लागला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या