सोलापूर | Solapur
जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे. याठिकाणी १७ पैकी १७ जागा भाजपा नेते राजन पाटील यांच्या बिनविरोध झाल्या आहेत. त्यात नगराध्यक्षपदी राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील रिंगणात होत्या. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या (अजित पवार) गटाच्या उज्ज्वला थिटे आणि अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, मंगळवारी झालेल्या अर्जांच्या पडताळणीनंतर ही निवडणूक बिनवरोधत झाली आहे.
याप्रकरणी चौकशीअंती उज्ज्वला थिटे यांचा अर्ज अपात्र ठरवला असल्याची माहिती अनगर नगरपंचायतचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी दिली आहे. दरम्यान, अनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी केवळ भाजपाच्या १७ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. हे सर्व बिनविरोध झाले आहेत. भाजपाचे नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक बिनविरोध झाले आहेत. त्यानंतर राजन पाटील यांच्या कुटुंबियांनी व कार्यकर्त्यांनी नगरपंचायत कार्यालयाबाहेर एकच जल्लोष केला.
अनगर नगरपंचायतीवर बिनविरोध निवडणून आल्यानंतर राजन पाटील समर्थकांनी उत्साहात मिरवणूक काढली. या रॅलीत राजन पाटलांसह त्यांचे चिरंजीवही सहभागी झाले होते. त्यात राजन पाटील यांचे चिरंजीव विक्रांत उर्फ बाळराजे पाटील आनंदाने बेभान झाल्याचे दिसून आले. यावेळी बाळराजे पाटील यांनी थेट कॅमेऱ्याच्या दिशेने बोट दाखवत अजित पवारांना आव्हान केले. “अजित पवार…सगळ्यांचा नाद करायचा, पण अनगरकरांचा नाही…” असे बाळराजेंनी म्हटले.
नगरपंचायत कार्यालयाबाहेर भाजपा कार्यकर्ते जल्लोष करत असताना बाळराजे पाटील एका कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसून जल्लोष करत होते. त्याचवेळी ते कॅमेऱ्याकडे बोट दाखवून अगदी त्वेषाने म्हणाले, “अजित पवार… सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाय.”
मागील अनेक वर्षापासून अनगर ग्रामपंचायतीवर राजन पाटील यांचे एकहाती वर्चस्व आहे. यावेळीही ही परंपरा कायम राखत १७ पैकी १७ जागा राजन पाटील यांच्या नेतृत्वात भाजपाच्या आल्या. राजन पाटील हे मोहोळचे माजी आमदार असून अलीकडेच त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. त्यामुळे अनगर नगरपंचायत निवडणूक राष्ट्रवादी आणि भाजपाने प्रतिष्ठेची केली होती.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





