अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पत्नीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून तसेच नोकरीत अडचणी निर्माण करण्याची आणि रजा मिळू न देण्याची धमकी देत सैनिकाला मानसिक त्रास दिल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद त्यांच्या पत्नीने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सोमवारी (28 सप्टेंबर) दिली आहे. या फिर्यादीवरून दोन लष्करी कर्मचार्यांविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील जामखेड रोडवरील आर्मी एरियात राहणार्या व मुळच्या केज (जि. बीड) तालुक्यातील 34 वर्षीय सैनिकाने आत्महत्या केली आहे. त्यांच्या 27 वर्षीय पत्नीने फिर्याद दिली असून त्यानुसार नायब सुभेदार निलकमल (पूर्ण नाव माहीत नाही) आणि हवालदार सचिन खेडकर यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही येथील आर्मी एरिया मध्ये कार्यरत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेसहा ते सकाळी 9.42 वाजेपर्यंत आर्मी एरिया, जामखेड रोड येथील वॉर्डमधील बेडवर सैनिकाने गळफास घेतल्याचे लक्ष्यात येताच त्यांना उपचारासाठी येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. मृताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पतीचे सहकारी असलेल्या दोन्ही संशयित आरोपींकडून त्यांना वेळोवेळी त्रास दिला जात होता. पतीकडे माझ्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून तुला येथे नोकरी व्यवस्थित करू देणार नाही.
तुझ्याबाबत वरिष्ठ अधिकार्यांना सांगून तुला अडचणीत आणू तसेच तुला रजा मिळू देणार नाही, अशा स्वरूपाचे बोलणे आरोपींकडून करण्यात येत होते, असा आरोप करण्यात आला आहे. या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या फिर्यादीवरून कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहेत.




