Tuesday, May 21, 2024
Homeनगरमद्यपी मुलाच्या मारहाणीत पित्याचा मृत्यू

मद्यपी मुलाच्या मारहाणीत पित्याचा मृत्यू

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

दारू पिण्यासाठी पैसे हवे म्हणून घरातील भांडी विक्रीला घेऊन जात असताना अटकाव केल्याने मुलाने केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना गोंधवणी येथे घडली. याबाबत श्रीरामपूर पोलीस ठाण्यात मयताच्या पुतण्याच्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

दिलीप साहेबराव शेळके (वय 55, रा. गोंधवणी, वार्ड क्र.1, श्रीरामपूर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर बबलू दिलीप शेळके (वय 31) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवार दि. 31 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजेनंतर मुलगा बबलू हा दारू पिण्यासाठी पैसे हवे म्हणून घरातील भांडे विक्रीसाठी घेऊन जात होता. त्यावेळी वडील दिलीप शेळके यांनी त्यास विरोध केला. याचा राग आल्याने मुलाने त्यांना मारहाण केली. त्यांच्या डोक्याला, गळ्यावर व छातीवर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी या घटनेचा उलगडा झाल्याने दिलीप शेळके यांचा पुतण्या संतोष शेळके यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बबलू शेळके याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केले असता दि. 6 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार दादाभाई मगरे करत आहेत. दोघे पितापुत्र एकत्र राहत होते तर मयताची पत्नी व एक मुलगा शिर्डी येथे राहण्यास आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या