Saturday, May 4, 2024
Homeनगरसोनेवाडीत घरकुल ‘ड’ यादीतील 178 लोकांचा सर्व्हेच नाही

सोनेवाडीत घरकुल ‘ड’ यादीतील 178 लोकांचा सर्व्हेच नाही

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील अनेक लाभार्थी घरकुल ‘ड’ यादीतून अपात्र झाले आहेत. तर 178 लाभार्थ्यांची नावे ‘ड’ यादीत असतानाही ते सर्व्हेतून वगळण्यात आल्याचा प्रकार पंचायत समिती प्रशासनाकडून घडला आहे. अपील करूनही कुठलाच न्याय मिळालेला नसल्याने कोपरगाव तालुका पंचायत समितीच्या प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

- Advertisement -

घरकुल संदर्भात सर्वच निकषांमध्ये काही गरजू लाभार्थी असतानाही त्यांना अपात्र म्हणून घोषित केले. ‘ड’ घरकुल यादीतील अपात्र लाभार्थींनी पंचायत समितीकडे याबाबत अपील केले होते मात्र त्यावर पारदर्शक कुठलीच कारवाई झाली नाही. ही बाब स्थानिक ग्रामस्थांसह उपसरपंच किशोर जावळे व ग्रामपंचायतीच्या प्रशासनाच्या लक्षात आली. घरकुल यादी संदर्भात अपात्र लाभार्थी व सर्व्हेतून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांचे फेर सर्वेक्षण होण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलवली जाईल यावरही प्रशासनाने योग्य निर्णय दिला नाही.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य चिलु जावळे, भास्कर जावळे, किसन खरात, कर्णा जावळे, बबलू जावळे, ज्ञानेश्वर दिघे, बाळासाहेब जावळे, मनसूमन जावळे, नाना बत्तीशे, शिवाजी दहे, नवनाथ भोजने, गणेश मिंड, दादासाहेब जावळे, राहुल जावळे, सचिन खरात, द्वारकानाथ जावळे, सोमनाथ रायभान, दीपक गुडघे, भाऊसाहेब खरात, विजय मिंड, राजेंद्र मिंड, संदीप वायकर उपस्थित होते.

घरकुल ‘ड’ यादीमध्ये सोनेवाडीतील 467 लाभार्थींचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये 141 लाभार्थी पात्र दाखवले तर 178 लाभार्थी अपात्र दाखवण्यात आले तर उर्वरित 148 लाभार्थी सर्वेक्षणातून वगळण्यात आले. कर्णा जावळे यांनी सांगितले की शासनाच्या ‘ड’ यादीतील घरकुलांच्या बाबतीत सर्व निकषांमध्ये सर्वसामान्य कुटुंब बसलेले असतानाही त्यांना अपात्र दाखवण्यात आले ही बाब चुकीची आहे. विशेष ग्रामसभा घेऊन शासनदरबारी न्याय मागितला जाईल. उपसरपंच किशोर जावळे यांनी आभार मानत विशेष ग्रामसभेची तारीख जाहीर केली जाईल असे सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या