सोनगीर – Songir – वार्ताहर :
दादरा नगर हवेली येथे विक्रीसाठी असलेली विदेशी दारूची गुजरात राज्यात वाहतूक करणार्या ट्रकला शुक्रवारी मध्यरात्री दोंडाईचा रस्त्यावर सोनगीर पोलिसांनी पकडली.
ट्रकसह 18 लाखांची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
धुळ्याकडून सोनगीर मार्गे दोंडाईचाकडे एका आयशर वाहनातून दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांना मिळाली होती.
त्यानुसार सोनगीर पोलिसांच्या पथकाने दोंडाईचा रोडवरील धनश्री हॉटेलच्या जवळ रात्री साडेबारा वाजता सापळा रचून आयशर वाहनाला (क्र. एम.एच 18 बी.जी 1905) पकडले. तपासणी केली असता आयशर गाडीत वरती झाडू भरलेल्या गोण्या आढळून आल्या.
यावेळी वाहनचालकाकडे झाडू असल्याची बिल मागितले. यावेळी उडवाउडवीची उत्तर मिळाल्याने सोनगीर पोलिसांना अधिक संशय आल्याने वाहनचालक व वाहनाची अधिक तपासणी केली असताना झाडूच्या गोण्या खाली दारूने भरलेले बॉक्स मिळून आले.
त्यामुळे वाहन सोनगीर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दरम्यान मुकेश वरदु जयस्वाल (वय 27) रा 34 संयोग नगर गांधी पॅलेस, इंदूर, फारुख जफार शेख (वय 20) रा. 101 शिरपूर काकड सागर पॅलेस, इंदूर यांना दारू विक्री अथवा वाहतुकीचा परवाना असल्याचे विचारले असता त्यांच्याकडे कुठलाच परवाना नसल्याचे दिसून आले.
दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता वाहनात असलेली दारू ही केंद्रशासित राज्य दिव दमन याठिकाणी विक्रीसाठी असल्याचे सांगितले.
हा दारूचा माल भिवंडी येथून वाहनात भरून गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी घेऊन जात असल्याचे सांगितले.
दरम्यान जप्त केलेल्या दारूची किंमत केंद्रशासित दिव दमन या राज्यात 8 लाख 42 हजार इतकी आहे.
तर महाराष्टात याच दारूची किंमत दहा लाखांच्या ट्रकसह 20 लाख 16 हजार इतकी आहे. असा 18 लाख 42 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक राजु भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील, उपनिरीक्षक एन.एम.सहारे, पोना शिरीष भदाणे, सदेसिंग चव्हाण, अतूल निकम यांनी केली. पुढील तपास उपनिरीक्षक एन.एम.सहारे करीत आहे.