Sunday, November 17, 2024
Homeराजकीयसंसद अधिवेशनाला सोनिया गांधी राहणार अनुपस्थित

संसद अधिवेशनाला सोनिया गांधी राहणार अनुपस्थित

नवी दिल्ली | New Delhi –

येत्या सोमवारपासून (14 सप्टेंबर) सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी

- Advertisement -

वैद्यकीय उपचारांसाठी परदेशात जाणार आहेत. त्यांच्या गैरहजेरीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे अनौपचारिकपणे पक्षाची सर्व सूत्रे असतील.

करोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर अतिशय सावधगिरी बाळगून सुरू होत असलेल्या संसदेच्या 18 दिवसांच्या अधिवेशनात वाढत्या संसर्गामुळे बहुतांश राजकीय पक्षांचे वरिष्ठ सदस्य नियमितपणे भाग घेण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

तृणमूल काँग्रेसने पक्षाच्या 65 वर्षांवरील सदस्यांना अधिवेशनात भाग न घेण्याच्या सूचना केल्या आहेत. काँग्रेसच्या खासदारांचा या अधिवेशनात पूर्णवेळ सहभाग असेल. मात्र, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि ए. के. अँटनी यांच्यासह वयाची पासष्टी आणि सत्तरी पार केलेल्या काँग्रेस पक्षातील नेत्यांचा अधिवेशनाच्या दैनंदिन कामकाजातील सहभाग पूर्णवेळ नसेल. सभागृहात महत्त्वाची विधेयके असतील तेव्हाच ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 14 सप्टेंबरला राज्यसभेच्या उपसभापतिपदाची निवडणूक झाल्यास वयोवृद्ध सदस्य संसदेत मतदानासाठी येतील. पण त्यानंतर त्यांचा उर्वरित अधिवेशनातील सहभाग हा महत्त्वाच्या विधेयकांवर होणार्‍या मतदानापुरता मर्यादित राहण्याची शक्यता आहे.

संसद भवनात लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज वेगवेगळ्या वेळांना होणार असून करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी बुधवारी पावसाळी अधिवेशनासाठी करण्यात आलेल्या विशेष व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांनी राज्यसभा सचिवालयातील कर्मचार्‍यांना राज्यसभेचे सभागृह आणि चार गॅलर्‍यांमध्ये सुरक्षित अंतरावर बसवून कामकाजाचा सराव केला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या