Monday, July 27, 2026
Homeक्राईमRahata : आणखी एक सोनोग्राफी मशीन जप्त

Rahata : आणखी एक सोनोग्राफी मशीन जप्त

पुण्याच्या टोळीकडून धक्कादायक खुलासे || मावळ मधून एक बोगस डॉक्टर गजाआड

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राज्याला काळिमा फासणार्‍या बेकायदेशीर लिंगनिदान चाचणी प्रकरणाचा लोणी पोलीस आणि अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर यांच्या पथकाने अत्यंत सखोल तपास सुरू केला आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये आतापर्यंत 16 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असून तपासाची चक्रे पुण्यातून थेट मावळ तालुक्यापर्यंत पोहोचली आहेत. पुण्यातून अटक केलेल्या तीन प्रमुख आरोपींच्या चौकशीतून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून पोलिसांनी आणखी एक बेकायदेशीर पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जप्त केले आहे.

- Advertisement -

पुण्यातील आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे, लोणी पोलीस आणि श्रीरामपूर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने वडगाव मावळ येथील केशवनगर भागात मोठी कारवाई केली. मारुती विश्वनाथ ढोरे (वय 48) या संशयिताचा दिवसभर माग काढत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मारुती ढोरे हा कोणताही अधिकृत डॉक्टर किंवा वैद्यकीय व्यावसायिक नाही. तरीही तो पुण्यातील टोळीकडून विकत घेतलेल्या पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या साहाय्याने बिनदिक्कतपणे बेकायदेशीर लिंगनिदान चाचण्या करत होता. पोलिसांनी त्याच्याकडून हे मशीन जप्त केले आहे. मात्र त्याची शारीरिक स्थिती पाहता, त्याला तपासासाठी हजर राहण्याची नोटीस देऊन तूर्तास ताब्यात ठेवण्यात आले आहे.

पुण्यातील मुख्य आरोपींनी अशा प्रकारची घातक आणि बेकायदेशीर मशीन्स इतरही अनेक डॉक्टरांना विकल्याची कबुली दिली आहे. पोलिसांना या सर्व संशयित डॉक्टरांची आणि दलालांची यादी मिळाली असून त्या दृष्टीने पथके रवाना करण्यात आली आहेत. त्यामुळे आगामी काळात वैद्यकीय क्षेत्रातील अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा गुन्हा केवळ कायद्याचे उल्लंघन करणारा नसून स्त्रीभ्रूण हत्येसारख्या सामाजिक कलंकाला खतपाणी घालणारा आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन या प्रकरणाकडे केवळ एक गुन्हा म्हणून न पाहता, एक सामाजिक जबाबदारी म्हणून अत्यंत संवेदनशीलतेने आणि गांभीर्याने तपास करत आहे. या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर लिंगनिदान करणार्‍या राज्यभरातील रॅकेटचे धाबे दणाणले असून, पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

गुन्ह्याचा तपास अत्यंत पारदर्शक आणि कडक पद्धतीने सुरू आहे. कोणत्याही आरोपीला पाठीशी घातले जाणार नाही. समाजात अनैतिक कृत्य करणार्‍या अशा प्रवृत्तींचा समूळ उच्चाटन करेपर्यंत ही मोहीम थांबणार नाही.
युवराज आठरे, तपास अधिकारी, लोणी पोलीस ठाणे

ताज्या बातम्या

धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर आता ‘E20 इंधन’ लक्ष्य; आम आदमी पार्टी आक्रमक,...

0
दिल्ली । Delhi केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता आम आदमी पार्टीने (AAP) केंद्र सरकारच्या २० टक्के एथेनॉल...