अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी व शेतकर्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम 2025-26 साठी राज्यांतर्गत पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकर्यांनी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.
शासनाच्या वतीने राबविण्यात येणार्या या स्पर्धेत रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस या 5 पिकांचा समावेश करण्यात आला आहे. पिकांच्या उत्पादन वाढीसाठी विविध प्रयोग करणार्या आणि भरघोस उत्पादन घेणार्या शेतकर्यांचा गौरव करणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. या स्पर्धेचा निकाल तालुका, जिल्हा आणि राज्य अशा तीन स्तरांवर जाहीर केला जाणार आहे. या तिन्ही स्तरांवर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी बक्षिसांच्या स्वरूपात तालुका पातळी प्रथम हजार, द्वितीय 3 हजार आणि तृतीय क्रमांकासाठी 2 हजार रुपयांचे बक्षीस राहणार आहेत.
तसेच जिल्हा पातळी प्रथम 10 हजार, द्वितीय 7 हजार आणि तृतीय 5 हजार तसेच राज्य पातळी प्रथम- 50 हजार, द्वितीय 40 हजार आणि तृतीय 30 हजार रुपयांचे बक्षीस आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकर्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे आवश्यक असून संबंधित पिकाखाली किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे अनिवार्य आहे. एका शेतकर्याला एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत भाग घेता येईल. स्पर्धेत प्रवेश शुल्क हे पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी 300 रुपये तर आदिवासी गटासाठी 150 रुपये निश्चित करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र अ), प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, 7/12 व 8/अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास), घोषित क्षेत्राचा नकाशा आणि बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे. शेतकर्यांनी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत सहभागी होऊन उत्पादन वाढीस हातभार लावावा, असे आवाहन श्री. बोराळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी शेतकर्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.




