आयसीसी टी-२० वर्ल्ड कपमधील ‘ग्रुप ऑफ डेथ’ मानल्या जाणाऱ्या ग्रुप D मधील एका अत्यंत चुरशीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. अहमदाबादच्या मैदानावर झालेला हा सामना क्रिकेट इतिहासातील सर्वात रोमांचक सामन्यांपैकी एक ठरला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडसोबत ‘सुपर ८’ फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे, तर दुसरीकडे अफगाणिस्तानचे या स्पर्धेतील आव्हान आता अधिकृतपणे संपुष्टात आले आहे.
या सामन्याचा थरार इतका मोठा होता की, विजेता ठरवण्यासाठी चक्क दोन सुपर ओव्हर खेळाव्या लागल्या. निर्धारित २० ओव्हर्समध्ये दोन्ही संघांनी १८७ धावा केल्यामुळे सामना टाय झाला. त्यानंतर झालेल्या पहिल्या सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघांनी प्रत्येकी १७ धावा केल्या, ज्यामुळे पुन्हा एकदा टायची स्थिती निर्माण झाली. अखेर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये या हाय-व्होल्टेज सामन्याचा निकाल लागला.
दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना २३ धावा कुटल्या. यामध्ये फॉर्मशी झगडणाऱ्या डेव्हिड मिलरने निर्णायक कामगिरी केली. मिलरने अवघ्या ४ चेंडूंमध्ये १६ धावा चोपून काढल्या, ज्यामुळे अफगाणिस्तानसमोर विजयासाठी २४ धावांचे कठीण लक्ष्य होते. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानच्या रहमानुल्लाह गुरबाजने जबरदस्त फटकेबाजी केली. विजयासाठी ४ चेंडूत २४ धावा हव्या असताना गुरबाजने सलग तीन षटकार खेचून सामन्यात खळबळ उडवून दिली. मात्र, केशव महाराजने त्याला बाद करत दक्षिण आफ्रिकेला ४ धावांनी विजय मिळवून दिला.
सामन्याच्या सुरुवातीला अफगाणिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात अडखळत झाली असली, तरी रायन रिकेल्टन आणि क्विंटन डीकॉक यांनी डाव सावरला. रिकेल्टनने ६१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर अनुभवी डीकॉकने ५९ धावांचे योगदान दिले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी रचून संघाला मजबूत स्थितीत नेले. अफगाणिस्तानकडून अजमतउल्लाह ओमरजईने भेदक गोलंदाजी करत ३ विकेट्स घेतल्या, तर कर्णधार राशिद खानने २८ धावांच्या मोबदल्यात २ फलंदाजांना तंबूत धाडले. या गोलंदाजांच्या कामगिरीमुळे अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेला १८७ धावांवर रोखण्यात यश मिळवले होते.
अफगाणिस्तानने संपूर्ण सामन्यात निकराची झुंज दिली, परंतु मोक्याच्या क्षणी झालेल्या दोन चुका त्यांना महाग पडल्या. डावाच्या २० व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर विजयासाठी एका धावेची गरज असताना फजलहक फारुकी धावबाद झाला. जर त्याने ती धाव पूर्ण केली असती, तर अफगाणिस्तानने निर्धारित वेळेतच सामना जिंकला असता. दुसरी चूक पहिल्या सुपर ओव्हरमध्ये झाली. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या चेंडूवर ७ धावांची गरज असताना फारुकीने दिशाहीन चेंडू टाकला, ज्यावर ट्रिस्टन स्टब्सने षटकार लगावून सामना पुन्हा टाय केला. या चुकांमुळे अफगाणिस्तानच्या हाता तोंडाशी आलेला विजय निसटला.
न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांसारख्या तगड्या संघांमुळे ग्रुप D ला ‘ग्रुप ऑफ डेथ’ म्हटले जात होते. गेल्या काही आयसीसी स्पर्धांमध्ये अफगाणिस्तानने आपल्या कामगिरीने सर्वांना चकित केले होते, मात्र यंदा त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. आधी न्यूझीलंड आणि आता दक्षिण आफ्रिकेकडून मिळालेल्या पराभवामुळे अफगाणिस्तानचे स्पर्धेतील गाशा गुंडाळला गेला आहे.




