अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात खरीप हंगाम 2025 ची तयारी सुरू आहे. यंदा हंगामासाठी सात लाख 42 हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. दरम्यान हंगामासाठी 86 हजार 618 बियाण्याची गरज असून कृषी विभागाने खाजगी व सार्वजनिक बियाणे कंपनीकडे ही नोंदवली असून 15 मे पासून शेतकर्यांना कपाशीचे बियाणे उपलब्ध होणार आहे. दरम्यान, मागील वर्षी विक्रमी पेरणी झालेल्या सोयाबीन पिकाचे क्षेत्र यंदा घटणार असून त्याऐवजी जिल्ह्यात मका आणि तूर पिकाचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे.
दरवर्षी उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात मे महिन्यांत खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाच्या वतीने करण्यात येते. जिल्ह्यात खरीप हंगामाचे पाच लाख 62 हजार 21 हेक्टर सरासरी क्षेत्र असून मागील वर्षी पावसाने चांगली सुरुवात केल्याने सात लाख 23 हजार 112 हेक्टर वर खरीप हंगामाच्या पेरण्या झाल्या होत्या. नगर जिल्हा हा रब्बी हंगामाचा जिल्हा असून परतीच्या पावसावर जिल्ह्यातील शेतीचे चित्र अवलंबून राहते. मात्र, गेल्या काही वर्षात खरीप हंगामाच्या सुरुवातीला अथवा तोंडावर दमदार पावसामुळे जिल्ह्यात खरीप हंगामाचे क्षेत्र वाढताना दिसत आहे.
खरीप हंगामात अकोले तालुक्यात भात हे मुख्य पीक असून उर्वरित भागात बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन आणि कपाशी हे मुख्य पीक मानले जाते. गेल्या वर्षी जिल्ह्यात एक लाख 55 हजार 825 हेक्टर वर कपाशी लागवड झाली होती, तर सोयाबीन पिकाची 1 लाख 86 हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. यासह उडीद, तुर या पिकाच्या पेरणीचे प्रमाण चांगले होते. मात्र, यंदा सोयाबीन पिकाचे क्षेत्र घटणार असून त्याऐवजी दक्षिण जिल्ह्यात कडधान्य तर उत्तरेत मका आणि तूर पिकाचे क्षेत्र वाढणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.
दरम्यान, हंगामासाठी 44 हजार 648 क्विंटल सार्वजनिक व 41 हजार 969 खाजगी कंपन्यांकडे असे 86 हजार 618 क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदवण्यात आली आहे. 15 मे नंतर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी आवश्यक असणार्या बियाणे उपलब्ध आहे. दरम्यान, जिल्ह्यात खरीप हंगामाच्या नियोजनसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आधी जिल्हा पातळीवर खरीप नियोजन त्यानंतर राज्य पातळीवर कृषी खात्याची स्वतंत्र बैठक होणार आहे.
प्रस्तावित क्षेत्र
भात 21 हजार हेक्टर, बाजरी 85 हजार हेक्टर, मका 91 हजार हेक्टर, तूर 77 हजार हेक्टर, मूग 51 हजार हेक्टर, उडिद 71 हजार हेक्टर, सोयाबीन 1 लाख 90 हजार हेक्टर, कपाशी 1 लाख 56 हजार हेक्टर.
बियाणे मागणी
भात 6 हजार 48, बाजरी 2 हजार 975, मका 13 हजार 650, तूर 5 हजार 929, मूग 1 हजार 683, उडिद 3 हजार 728, सोयाबीन 49 हजार 875, कापूस 2 हजार 730 क्विंटल बियाणे मागणी करण्यात आली असून जिल्ह्यात बियाणे उपलब्ध होण्यास सुरूवात झाली आहे. (आकडे क्विंटलमध्ये)
सोयाबीन कवडीमोल
मागील वर्षी नगर जिल्ह्यात सोयाबीन पिकाची विक्रमी उत्पादन झाले. सरकारने शेतकर्यांच्या सोयाबीनला सहा हजार रुपये क्विंटल दर देण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात चार क्विंटलपेक्षा अधिक भाव शेतकर्यांच्या सोयाबीनला मिळू शकला नाही. यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. सरकारने हमी भाव केंद्र सुरू करण्यास उशीर झाला. तसेच या ठिकाणी असणार्या अटीमुळे शेतकर्यांचे सोयाबीन कमी दरात विकण्याची वेळ आली. यामुळे यंदा नगर जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र घटणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.