अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
गतवर्षाच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना राज्य सकारच्यावतीने मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मदतीसाठी नगर जिल्ह्यात पाच लाखांहून अधिक शेतकरी पात्र ठरणार असून त्यांना जवळपास 175 कोटीपर्यंत मदत मिळणार असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, पात्र शेतकर्यांपैकी सुमारे 80 ते 90 टक्के शेतकर्यांची माहिती ऑनलाईन संकेतस्थळावर भरण्यात आली आहे.
महायुती सरकारने 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार (दोन हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकर्यांसाठी अर्थसाहाय्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार आता योजनेत पात्र असणार्या शेतकर्यांची माहिती कृषी विभागाच्यावतीने ऑनलाईन शासनाच्या संकेतस्थळावर भरण्यात येत आहे.
यासाठी ई-पिक पाहणीचा आधार घेण्यात येत आहे. ज्याठिकाणी ई-पिक पाहणी नोंदी नाहीत, अशा ठिकाणच्या शेतकर्यांची यादी तयार करून त्या तलाठी यांच्यावतीने खातजमा करून ती मंजूर करून कृषी साहय्यक यांच्याकडे देण्यात येणार असल्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. जिल्ह्यात व्यक्तीगत खातेदार यांची गतवर्षीच्या सोयाबीन आणि कपाशी पिकाची माहिती उपलब्ध झाली आहे. आता संयुक्त खातेदार असणार्यांची अडचण येत असून त्यांनी प्रतिज्ञापत्राव्दारे एका खातेदाराची शिफारस केल्यानंतर त्यांची माहिती कृषी विभाग ऑनलाईन करणार आहे. नगर जिल्ह्यात सोयाबीन आणि कपाशीच्या नुकसान भरपाईसाठी 5 लाख 40 हजारांच्या जवळपास पात्र ठरण्याचा अंदाज कृषी विभागाच्या सुत्रांनी व्यक्त केला आहे. त्यांना 175 हजारांपर्यंत मदत मिळू शकते असा अंदाज आहे.