Saturday, July 27, 2024
Homeनगरसोयाबीनसाठी भंडारदर्‍याचे तातडीने पाणी द्या - राठी

सोयाबीनसाठी भंडारदर्‍याचे तातडीने पाणी द्या – राठी

लोणी |वार्ताहर| Loni

सर्व धरणे भरली, नदी आणि कालव्यांना पाणी वाहत असताना चार्‍या बंद असल्याने सोयाबीनचे पीक पाण्यावाचून हातातून जाण्याची शक्यता आहे. पाटबंधारे विभागाने तातडीने चार्‍या सोडाव्यात, अशी मागणी विखे पाटील ट्रक्स वाहतूक संस्थेचे चेअरमन नंदकिशोर राठी व शेतकर्‍यांनी केली आहे.

- Advertisement -

प्रवरा परिसरात पावसाळा सुरू झाल्यापासून एकही मोठा पाऊस पडला नाही. फक्त पेरणीपुरता पाऊस पडला आणि त्यानंतर पिकाच्या वाढीसाठी आवश्यक पाऊस झाल्याने सोयाबीनसारखी पिके चांगल्या स्थितीत आहेत. मात्र विहिरी आणि बोअरवेल कोरडेच आहेत. शेकडो एकर सोयाबीन पिकाला सध्या पाण्याची अत्यंत गरज आहे. सोयाबीनचे पीक शेंग अवस्थेत असून पावसाने आठ-दहा दिवसांपासून उघडीप दिल्याने हे पीक संकटात सापडले आहे. त्याचा उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो.

यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच धरणावर चांगला पाऊस झाल्याने धरणे लवकर भरली. जायकवाडी धरणही अपेक्षित वेळेआधी भरले. प्रवरा नदी महिनाभरापासून वाहत आहे. प्रवरा कालव्यांनाही पाणी सोडण्यात आले मात्र चार्‍या बंद असल्याने पाणी असून पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. पाटबंधारे विभागाचे चुकीचे धोरण नेहमीच शेतकर्‍यांच्या नुकसानीला कारणीभूत ठरत आले आहे. पाण्याचे योग्य नियोजन त्यांच्याकडून होत नाही. गेल्या वर्षी पाणी असूनही नियोजन न झाल्याने खरीप पिकांना वेळेवर पाणी मिळाले नाही. परिणामी पावसाळ्यापर्यंत धरणात सहा टीएमसी पाणी शिल्लक राहिले.

यावर्षी मात्र राधाकृष्ण विखे पाटील हे राज्यात मंत्री असल्याने पाण्याचे नियोजन वेळेत आणि योग्य पद्धतीने होईल, असा विश्वास व्यक्त करून सध्या सोयाबीन पिकासाठी तातडीने चार्‍या सोडाव्यात, अशी मागणी नंदकिशोर राठी यांच्यासह प्रवरा बँकेचे संचालक किसनराव विखे, विखे कारखान्याचे संचालक संजय आहेर, दादासाहेब घोगरे, हसनापूर विकास सोसायटीचे चेअरमन पिरमहम्मद पटेल, पाथरे बुद्रुक सोसायटीचे चेअरमन अशोकराव कडू, कृषीभूषण बन्सी तांबे, लोणी बुद्रुक तंटामुक्तीचे अध्यक्ष संपतराव विखे, मच्छिंद्र विखे आदींसह शेतकर्‍यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या