Wednesday, May 22, 2024
Homeनगरडोळ्यादेखत जळत असलेली सोयाबीन पाहून शेतकरी हतबल

डोळ्यादेखत जळत असलेली सोयाबीन पाहून शेतकरी हतबल

घारी |वार्ताहर| Ghari

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे, घारी, मुर्शतपूर, हिंगणी परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून शेतकर्‍यांनी आपल्या शेतात घेतलेली सर्वच पिके डोळ्यादेखत जळून जात आहे. यामुळे जनावरांच्या चार्‍याचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

हिंगणी येथील शेतकरी भगीरथ गंगाधर पवार यांनी 2 एकर सोयाबीन पिकात गायी चारल्या, जालिंदर पवार यांनी 4 एकर सोयाबीन नांगरून टाकली तर चांदेकसारे येथील विनायक आढेराव यांनी 9 एकर सोयाबीन क्षेत्र ट्रॅक्टरने नांगरून टाकले आहे. अनेक गावातील इतर अनेक शेतकर्‍यांची सोयाबीन मका जळून गेली आहे असे विदारक चित्र या परिसरात पहावयास मिळत आहे.

निसर्गाचा लहरीपणा, मशागतीचा खर्च, औषधे किटकनाशके, पेरणी, नांगरट, बी बियाणे, मजुरी, तणनाशक, सोंगणी हा खर्च एकरी 35 हजारांच्या आसपास जातो. चार महिने जमीन गुंतून पडते. सोयाबीनचा आतापर्यंत 1 एकराचा खर्च 35 हजार येत असल्याचे शंकरराव काळे कारखान्याचे संचालक हरिभाऊ शिंदे यांनी सांगितले.

यावेळी शेती व्यवसायातील अनेक अडचणी सांगताना त्यांचा कंठ दाटून आला. या पिकांचा योग्यवेळी पंचनामा झाला तर शेतकर्‍यांच्या पदरात काहीतरी नुकसान भरपाई पडेल, अशी आशा हिंगणी येथील शेतकरी सागर पवार, दत्तू पवार, धनराज पवार, पंडित पवार, मनसुख कुदळे, किरण दहे, कांतीलाल पवार, संदीप पवार, रतन भवर, तात्या पवार, धर्मा पवार यांनी व्यक्त केली आहे. शासनाने तात्काळ शेतकरी बांधवांना भरपाई दिली पाहिजे, अशी मागणी हरिभाऊ शिंदे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या