Friday, November 15, 2024
Homeनगरसोयाबीनने यंदा शेतकर्‍यांना दाखविल्या वाकुल्या

सोयाबीनने यंदा शेतकर्‍यांना दाखविल्या वाकुल्या

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

कमी पर्जन्यमान आणि घटलेले सोयाबीनचे एकरी उत्पादन यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. उत्पादन घटले, आणि भाव ही कमी असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत.

- Advertisement -

सोयाबीन सारखे पीक हे शेतकर्‍यांना पैसे मिळवून देणारे हुकमी पीक! परंतु यावर्षी पावसाने पेरणीपुरते तोंड दाखविले, नंतर मात्र तोंड लपविले. त्यामुळे उगवून आलेल्या सोयाबीन कोमेजून गेल्या, काही ठिकाणी जळाल्या तर काही ठिकाणी हाती आल्या परंतु उत्पादन अवघे 25 टक्क्यांहून कमी हाती आलेे. त्यामुळे शेतकरी पुरता हातबल झाला आहे. अस्तगाव परिसरासह राहाता तालुक्यातील शेतकर्‍यांची ही स्थिती आहे.

अस्तगाव येथे सोयाबीन खरेदी केंद्रे आहेत. दरवर्षी या दिवसात अस्तगावला दररोज 500 ते 700 क्विंटल सोयाबीनची खरेदी दररोज होते. परंतु यावर्षीचे चित्र काहिसे वेगळेच आहे. यावर्षी 100 ते 150 क्विंटलची खरेदी दररोज होताना दिसत आहे. यंदा दुष्काळी स्थितीमुळे उत्पादन घटले, काहींनी सोयाबीनच्या उभ्या पिकात नांगर घातला. ज्यांना स्प्रिंकलरने पाणी देणे शक्य होते. अशा थोड्या शेतकर्‍यांना 7 ते 8 क्विंटल सोयाबीन एकरी मिळाले.

पावसावर हुकून चुकून ज्यांनी सोयाबीन जगविले त्यांना 3 ते 4 क्विंटल सोयाबीन हाती लागले. त्यातही सोयाबीनचा आकार लहान राहिला. सोयाबीन काढणीचा व सोयाबीन शेतात गोळा करून देण्याचा एकरी दर 4 ते 5 हजार रुपये एकर असा असल्याने शेतातील उत्पादनात काय हाती लागणार हा खरा प्रश्न आहे. त्यातच सोयाबीन यंत्रात काढून देणार्‍यांचा मजुरांसह प्रतिक्विंटलला दर 350 रुपये क्विंटल असा आहे. उत्पादनापेक्षा तयार करण्याचा खर्चच वाढला आहे. सध्या सोयाबीनला 4 हजार ते साडेचार हजार असा दर प्रतिक्विंटलला मिळत आहे. काही शेतकर्‍यांनी मागील वर्षाची सोयाबीनही घरात साठवून ठेवली आहे. पुढे दिवाळी आहे. दिवाळसणाचा खर्च कसा भागविणार या विवंचनेत शेतकरी आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत सोयाबीनला भाव नाही. या भागातील सोयाबीन लातुर, धुळे, सांगली, आदी ठिकाणी प्रक्रिया उद्योगाकडे रवाना होते. सोयाबीन मधुन 15 टक्के तेल मिळते. तर 85 टक्के ड्राय ऑईल केक (पेंड) बनते. ड्राय ऑईल केकला परदेशात कॅटल फिड म्हणुन मोठी मागणी आहे. पोल्ट्रीलाही खाद्य म्हणुन वापरले जाते. अर्थात सोयाबीन निर्यात झाले तरच आपल्याला चांगला भाव मिळू शकतो.

– संतोष गोर्डे, साईपुजा ट्रेडर्स, अस्तगाव

दरवर्षी आपल्याला 70 ते 75 पोती सोयाबीन होते. यंदा जास्तीत जास्त दहा पोते सोयाबीन होईल. नांगरणी, पेरणी, खुरपणी, खते, सोंगणी, काढणी हा सर्व खर्च वजा जाता हातात काय राहील? त्यात सोयाबीनला क्वालिटी हवी तशी नाही. शेतकरी यंदा अडचणीत आहे.

– रविंद्र जेजुरकर, सोयाबीन उत्पादक

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या