अहिल्यानगर (प्रतिनिधी)
बदली होऊन देखील स्थानिक गुन्हे शाखेतून (एलसीबी) बदली ठिकाणी कार्यमुक्त करण्यात न आलेल्या 11 अंमलदारांना आणि पथकात कार्यरत असलेल्या 7 अंमलदारांना – अशा एकूण 18 पोलीस अंमलदारांना त्यांच्या मुळ नेमणुकीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिले आहेत. वारंवार आदेश काढून देखील एलसीबीच्या प्रभारी अधिकार्यांनी ते न जुमानल्याने अधीक्षक घार्गे यांनीच आदेश काढून अंमलदारांना कार्यमुक्त केले आहे.
अलिकडच्या काळात एलसीबी चांगलीच चर्चेत आली आहे. वारंवार होत असलेल्या आरोपांमुळे अधीक्षक घार्गे यांनी एलसीबीवर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. प्रशासकीय बदली होऊन देखील काही अंमलदार वर्षानुवर्षे एलसीबीत कार्यरत होते. त्यांना प्रभारी अधिकार्यांचे पाठबळ मिळत असल्याने त्यांची मुजोरी वाढली होती. काही अंमलदारांचे काम चांगले होते, मात्र काही अंमलदार फक्त हुजरेगिरी करण्यात पुढे होते. अखेर अशा अंमलदारांना त्यांच्या बदली ठिकाणी कार्यमुक्त करण्यात आले आहे.
11 पोलीस अंमलदारांची प्रशासकीय/विनंती बदली करण्यात आली होती. बदली झाल्यानंतर त्यांना बदली ठिकाणी तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश अधीक्षक घार्गे यांनी दिले होते. मात्र एलसीबीचे प्रभारी अधिकार्यांनी हे आदेश न जुमानल्याने अखेर 8 ऑगस्ट रोजी अधीक्षक घार्गे यांनी स्वतः बदली झालेल्या 11 अंमलदारांना त्यांच्या बदली ठिकाणी कार्यमुक्त करण्याचा आदेश काढला. तसेच, एलसीबीत गेल्या चार ते पाच वर्षांपासून कोणत्याही अंमलदारांची मूळ नियुक्ती दिलेली नाही. यामुळे एलसीबीसाठी काम करण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली होती. या पथकातील सात अंमलदार पथक रद्द होऊन देखील एलसीबीत काम करत होते. त्यांना त्यांच्या मुळ नेमणुकीच्या ठिकाणी हजर होण्याबाबत अधीक्षक घार्गे यांनी आदेश दिले आहेत.
बदली होऊन देखील कार्यमुक्त न करण्यात आलेल्या अंमलदारांना आता कार्यमुक्त करण्यात आले आहे. यामुळे एलसीबीच्या प्रभारी अधिकार्यांनी संबंधित 11 पोलीस अंमलदारांचे ऑगस्ट 2025 च्या वेतनाची आकारणी एलसीबीमार्फत न करता त्यांचे अंतिम वेतन प्रमाणपत्र तात्काळ बदली ठिकाणी पाठवावे. तसेच, संबंधित अंमलदार बदली ठिकाणी हजर न झाल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या/शाखेच्या प्रभारी अधिकार्यांनी त्या अंमलदारांच्या ऑगस्ट 2025 च्या वेतनाची आकारणी न करता त्यांचा कसुरी अहवाल पाठविण्याचे आदेश अधीक्षक घार्गे यांनी दिले आहेत.दरम्यान, पथकातील सात अंमलदारांना कार्यमुक्त करून त्यांच्या मुळ नेमणुकीच्या ठिकाणी हजर राहण्यास सांगितले आहे. ते हजर न झाल्यास त्यांचे ऑगस्ट 2025 च्या वेतनाची आकारणी न करता कसुरी अहवाल तात्काळ पाठविण्याचे आदेश दिले आहेत.
एलसीबीत मुळ नेमणुकीस असलेल्या अंमलदारांची संख्या चार आहे. तेथे काम करत असलेल्या 18 अंमलदारांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. मात्र, सायबर पोलीस ठाण्यातून एलसीबीसाठी संलग्न करण्यात आलेल्या अंमलदारांना त्यांच्या सायबर पोलीस ठाण्यात कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. ते पाहुणे म्हणून एलसीबीत आले आहेत. त्यापैकी काही अंमलदारांना एलसीबीत नियुक्ती दिली जाणार आहे, तर काही अंमलदारांची बदली त्यांच्या विनंतीवरून पोलीस ठाण्यात/शाखेत करण्यात येणार असल्याचे अधीक्षक घार्गे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
वर्षानुवर्षे एलसीबीत कार्यरत असणार्यांना त्यांच्या बदली ठिकाणी कार्यमुक्त करण्यात आले आहे. एलसीबीसाठी नवीन अंमलदारांना दोन दिवसांत नियुक्ती दिली जाईल.
– सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक.




