अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शहरातील कायदा- सुव्यवस्था बिघडली असून याचे पडसाद विधीमंडळातही उमटले आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश शहर पोलिसांना दिले आहेत. ते स्वत: सोमवारी रात्री रस्त्यावर उतरले. त्यांनी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून दारू पिऊन वाहने चालविणार्यांसह सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणार्यांवर कारवाई केली आहे.
सहा महिन्यांपासून शहराची शांतता धोक्यात आली आहे. छोट्या- मोठ्या घटनांमधून दगडफेक, खून, हाणामार्यांच्या घटना घडत आहेत. चोरी, घरफोडी, सोनसाखळी चोरीच्या घटना थांबायला तयार नाहीत. मागील महिन्यात बालिकाश्रम रस्त्यावर तलवार, कोयते, लाकडी दांडक्याने हल्ला करून ओंकार भागानगरे या तरुणाचा खून झाला. त्यानंतर पाईपलाईन रस्त्यावर मयुर सोमवंशी या युवकावरही प्राणघातक हल्ला झाला. गेल्या शनिवारी अंकुश चत्तर यांची एकविरा चौकात हत्या करण्यात आली. ‘फिल्मी स्टाईल’ घडलेल्या या घटनेमुळे सावेडीसह शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले अवैध धंदे, हॉटेल व चौका-चौकांत उशिरापर्यंत थांबून असणारी गर्दी मोठ्या घटनांना कारणीभूत ठरत आहे. सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न काही तरूणांकडून केला जात आहे. तलवार, कोयता, गावठी कट्ट्यांचा वापर सर्रास वाढला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अधीक्षक ओला यांनी शहर पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी ते स्वत: रस्त्यावर उतरले आहेत. सोमवारी रात्री त्यांनी पथकासह तोफखाना हद्दीत अनेक ठिकाणी नाकबंदी केली. दुचाकीवरून फेरफटका मारत सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करून शांततेचा भंग करणार्या नऊ व्यक्तींविरूध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110 व 117 प्रमाणे कारवाई केली. याशिवाय दारूबंदी अधिनियमानुसार दोघांवर, दारू पिऊन वाहन चालविणार्या एकाविरूध्द कारवाई केली. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
….तर परवाना रद्द
रात्री 11 वाजेनंतर हॉटेल, परमीट व इतर आस्थापना सुरू असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. दोन वेळा कारवाई केल्यानंतर तिसर्यांदाही संबंधित हॉटेल, परमीट रूम सुरू असल्यास त्यांचा परवाना रद्द करण्याबाबत कार्यवाही केली जाणार आहे. तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्याबाबत पोलिसांना आदेश दिले असल्याचे अधीक्षक ओला यांनी सांगितले.
11 नंतर बंद म्हणजे बंदच
मध्यंतरी जातीय तेढ निर्माण करणार्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सूचना करून रात्री 11 वाजेनंतर आस्थापना बंद ठेवण्याचे सांगितले होते. त्याची अंमलबजावणी काही दिवसच झाली. पोलिसांनाही याचा विसर पडला. दरम्यान, यापुढे वाईन शॉप, परमीट रूम, हॉटेलसह इतर आस्थापना 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. 11 नंतर आस्थापना सुरू ठेवणार्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश अधीक्षक ओला यांनी दिले आहेत.
रॅपिड अॅक्शन फोर्स दाखल
आगामी सण- उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून नगर पोलिसांच्या मदतीला मुंबईहून केंद्रीय रॅपिड अॅक्शन फोर्सचे विशेष पथक नगर शहरात दाखल झाले आहे. या पथकाने कोतवाली व तोफखाना पोलिसांच्या पथकासह शहरात रूटमार्च काढत संवेदनशील भागाची पाहणी केली.