अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पिठासीन अधिकार्यांनी एखाद्या विषयावर स्वतःचे प्रतिकूल मत असले तरी मर्यादा पाळल्या पाहिजे, असे मत विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांच्या मर्सिडीज भाष्य प्रकरणावर व्यक्त केले. दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा विभाजन होणार नसल्याचे भाष्य केले आहे व त्यावर बोलताना प्रा. शिंदे म्हणाले, ते त्यांचे मत असू शकेल मात्र जिल्हा विभाजनाबाबत सभागृहात विषय उपस्थित झाला तर त्या चर्चेला कशी कलाटणी देता येईल हे जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून मी पाहील, असे सूचक भाष्यही त्यांनी केले.
विधान परिषदेचे सभापती शिंदे यांनी नगरमध्ये माध्यमाशी संवाद साधला. यावेळी भाजपचे प्रदेश पदाधिकारी बेरड, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहर सरचिटणीस सचिन पारखी उपस्थित होते. यावेळी सभापती शिंदे यांनी मी विधान परिषदेचा सभापती असल्याने व ते पद संवैधानिक असल्याने मत व्यक्त करण्यावर मर्यादा असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मढी ग्रामस्थ मुस्लिम व्यावसायिक बंदी ठराव, नगरचा बिहार झाल्याच्या खा. लंके यांच्या दाव्यावर मत व्यक्त करण्यास त्यांनी नकार दिला.
येत्या तीन मार्चपासून सुरू होणार्या बजेट अधिवेशनात सभापती म्हणून प्रत्यक्ष कामाचा अनुभव मी घेणार आहे, असे स्पष्ट करून आमदारांच्या अपात्रता प्रकरणी सुनावणी झाली आहे व त्यांना वेळ वाढवून दिला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जन्म वर्ष सोहळा 31 मे रोजी होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले आहे. या पार्श्वभूमीवर चोंडी येथे मंत्रिमंडळ बैठक घ्यावी व चौंडी गाव राष्ट्रीय स्मारक जाहीर करून त्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व सुविधा तिथे व्हाव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे सभापती शिंदे यांनी सांगितले.
ती तक्रार म्हणजे पराभवाची कारणे
शिर्डी मतदारसंघात मतदार वाढल्याची राहुल गांधींनी केलेली तक्रार म्हणजे पराभवाची कारणे देण्यासारखे आहे. या मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी तयार होत असताना, नव्या मतदारांची नोंदणी होत असताना त्यावेळी कोणीही हरकत घेतली नाही, परंतू पराभवानंतर कोणाला तरी दोष देण्याच्या प्रकार आहे, असे भाष्यही प्रा. शिंदे यांनी केले.