अहिल्यानगर/ सोनई |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्यादृष्टीने राजकीय हालचालींना वेग आला असून विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या सोनई येथील निवासस्थानी दुसर्यांदा भेट दिली. मंगळवारला झालेल्या या भेटीत माजी खासदार यशवंतराव गडाख आणि माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्याशी तासभर चर्चा झाली.
जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम टप्प्यात या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, या दृष्टीने विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी जिल्हा बँकेच्या राजकीय वर्तुळातील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभापती राम शिंदे यांच्या या भेटीप्रसंगी माजी मंत्री शंकरराव गडाख, प्रा. भानुदास बेरड, विश्वासराव गडाख, उद्योजक विजयराव गडाख तसेच अर्थ व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती सुनील गडाख आदी उपस्थित होते.
चूकला चूक आणि बरोबराला बरोबर म्हणा- शिंदे
दरम्यान, पालकमंत्र्यांनी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात बैठक बोलावलीय. या बैठकीला आपण उपस्थित राहणार असल्याचं शिंदेंनी सांगत पालकमंत्र्यांशी चर्चा करून आपण गडाखांच्या भेटीला आलेलो नाही, असंही त्यांनी सांगितलं. दसर्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे जिल्हा बँकेच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झालीय. बँकेच्या निवडणुकीत ज्याची चूक आहे, त्याला चूक म्हणा आणि ज्याचं बरोबर आहे त्याला बरोबर म्हणा, अशी भूमिका त्यांनी मांडली.




