Saturday, November 16, 2024
Homeनगरसभापती आरक्षण सोडतीचा निर्णय लांबणीवर

सभापती आरक्षण सोडतीचा निर्णय लांबणीवर

शासनाकडून माहिती उपलब्ध न झाल्याने पुढील सुनावणी 2 जानेवारीला

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- शासनाकडून आवश्यक ती माहिती उपलब्ध होऊ न शकल्याने जिल्हा परिषद सदस्या संगीता बन्सी गांगुर्डे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पंचायत समिती सभापतिपद आरक्षणाबाबत दाखल केलेल्या याचिकेवर काल कोणताही निर्णय होऊ शकला नाही. आता 2 जानेवारी 2020 रोजी या याचिकेची सुनावणी होणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, शासन निर्णय आल्यानंतर 7 दिवसांनी निर्णय घेऊन जिल्ह्यातील पंचायत समिती निवडणूक प्रोग्राम जाहीर केला जाईल, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी न्यायालयासमोर सांगितले. एकंदरितच न्यायालयीन कचाट्यात सापडलेल्या श्रीरामपूर पंचायत समिती सभापतिपदाबाबत पेच निर्माण झाला आहे.

श्रीरामपूर पंचायत समितीत अनुसूचित जातीकरिता आजपर्यंत आरक्षण निघाले नाही. त्यामुळे अनुसूचित जातीच्या उमेदवारांना प्रतिनिधीत्व मिळाले नाही. आरक्षण हे रोटेशन पध्दतीने काढले पाहिजे, अशी कायद्यात तरतुद असतानाही हा नियम पाळण्यात आला नाही. त्यामुळे टाकळीभान गटातील जिल्हा परिषद सदस्या संगीता बन्सी गांगुर्डे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.

त्यावर काल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. मात्र शासनाचा निर्णय प्रलंबित असल्याने याबाबत न्यायालयाने दि. 2 जानेवारी रोजी सुनावणी घेण्याचे सांगितले. त्यामुळे याबाबत 2 जानेवारीला सुनावणी झाल्यानंतरच निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचिकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. अजित काळे काम पाहत आहेत.

दरम्यान, श्रीरामपूर पंचायत समितीचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी निघाले होते. यापदाकरिता केवळ डॉ. वंदना मुरकुटे पात्र आहे. त्यामुळे सभापतीपदी डॉ. वंदना मुरकुटे यांची वर्णी लागण्याची शक्यता असताना आता आरक्षण बदलले तर मुरकुटे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

विखे-मुरकुटे गटाचे सदस्य सिंधुदुर्गला सहलीला
गेल्यावेळी श्रीरामपूर पंचायत समिती निवडणुकीनंतर समसमान मते झाल्याने चिठ्ठी काढून सभापती निवड करण्यात आली होती. त्यामुळे आताही ती वेळ पुन्हा येऊ नये म्हणून सदस्य पळवापळवी होऊ शकते. हे लक्षात घेऊन मुरकुटे-विखे गटाचे सभापती दीपक पटारे, उपसभापती बाळासाहेब तोरणे, कल्याणी कानडे, वैशाली मोरे हे दि.25 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग येथे सहलीला गेले आहेत. काल आरक्षणाबाबत दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होती. त्यामुळे सभापती दीपक पटारे काल आले होते. तेही आज पुन्हा सिंधुदुर्ग येथे रवाना होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या