अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अनेक वर्षांपासून थकीत पगार मिळत नसल्याने तणावात असलेल्या नगर तालुका साखर कारखान्यातील कामगाराने मंगळवारी (26 मे) शहरातील सहकारी संस्था (साखर) कार्यालयात थेट अधिकार्यांच्या दालनात जाऊन फाशी घेण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. अखिल सुभान शेख (वय 65, रा. जणखगाव, ता. अहिल्यानगर) असे या कामगाराचे नाव असून, त्यांनी कीटकनाशक औषध व पेट्रोलची बाटली हातात घेत प्रथम विशेष लेखा परीक्षक यांच्या टेबलावर उभे राहत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, तोफखाना पोलिसांनी वेळेवर धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेख हे नगर तालुका साखर कारखान्यात कामगार म्हणून कार्यरत होते. संबंधित कारखाना सध्या बंद अवस्थेत असून कारखान्याचा कार्यभार सहकारी संस्था (साखर) कार्यालयातील अधिकार्यांकडे आवसायक म्हणून देण्यात आला आहे. कारखान्याकडून तब्बल तीन लाख 80 हजार रूपयांची थकबाकी मिळणे बाकी असल्याचे शेख यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून थकीत पगारासाठी त्यांनी संबंधित कार्यालयात वारंवार चकरा मारल्या. मात्र, अधिकार्यांकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. आर्थिक अडचणीमुळे त्रस्त झालेल्या शेख यांनी अखेर संतापाच्या भरात सावेडीतील सहकारी संस्था (साखर) कार्यालयात कार्यालयात प्रवेश केला आणि अधिकार्यांच्या दालनातच टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे कार्यालयात एकच गोंधळ उडाला.
कर्मचार्यांनी तत्काळ डायल 112 क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार रावसाहेब खेडकर, अनिल रोकडे, तनवीर शेख, सौरभ त्रिमुखे, राहुल शेळके, विशाल कुलकर्णी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत अखिल शेख यांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली. दरम्यान, सहकारी संस्था (साखर) कार्यालयातील प्रथम विशेष लेखा परीक्षक यांच्या समक्ष शेख यांची समजूत काढण्यात आली. त्यांचे मनपरीवर्तन करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.




