Friday, May 3, 2024
Homeब्लॉगस्पंदन : किशोरकुमारचे ‘आभास’कुमार...

स्पंदन : किशोरकुमारचे ‘आभास’कुमार…

स्पंदन : किशोरकुमारचे ‘आभास’कुमार…

सुरुवातीलाच या लेखाच्या शीर्षकाविषयी स्पष्टीकरण देत आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतला

- Advertisement -

महान पार्श्वगायक किशोरकुमार गांगुलीचं खरं नाव ‘आभासकुमार’ होतं. पण उच्चार

करताना ‘आभास’ ऐवजी ‘अब्बास’ असा भास ऐकणाऱ्याला व्हायचा. म्हणून मग त्याच्या

माता-पित्यांनी ‘किशोरकुमार’ असं त्याचं नामकरण केलं. किशोरकुमारच्या आवाजाचा

आभास निर्माण करणाऱ्या गायकांविषयी या लेखात चर्चा केली आहे. म्हणूनच

‘किशोरकुमारचे आभासकुमार’ असं शीर्षक या लेखाला दिलं आहे. १३ ऑक्टोबर १९८७

रोजी किशोरकुमारने जगाचा निरोप घेतला. त्याच्या ३४ व्या स्मृतीदिनानिमित्त ही

स्मरणांजली…

स्पंदन : दूरदर्शनच्या नवलाईचे दिवस…

किशोरकुमारच्या कारकिर्दीचे दोन ठळक टप्पे करता येतात. एक म्हणजे १९६९ पूर्वीचा

आणि दुसरा म्हणजे १९६९ नंतरचा. १९६९ पूर्वी किशोरकुमार हिंदी चित्रपटांमध्ये विनोदी

भूमिका करायचा. पार्श्वगायन फारसं गांभीर्याने घ्यायचा नाही. स्वत:च्या सिनेमांसाठी

आणि अभिनेता देव आनंद यांच्यासाठीच प्रामुख्याने गायचा. गायनासाठी चित्र-विचित्र अटी

ठेवायचा. पत्रकारांना मुलाखत द्यायचं टाळायचा. त्या काळात दूरदर्शनवर ‘फूल खिले है

गुलशन गुलशन’ हा कार्यक्रम तबस्सूम नावाची कलावंत सादर करायची. यात ती

कलावंतांच्या मुलाखती घ्यायची. हा कार्यक्रम फार लोकप्रिय होता. तबस्सूमला या

कार्यक्रमात किशोरकुमारची मुलाखत घ्यायची होती. पण मुलाखत घेताना किशोर झाडावर

बसेल आणि तबस्सूम झाडाखाली, अशी अट त्याने घातली. साहजिकच ही मुलाखत होऊ

शकली नाही. १९६९ मध्ये ‘आराधना’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात किशोरकुमारने

गायलेली गाणी मोहम्मद रफीच्या गाण्यांपेक्षा जास्त लोकप्रिय झालीत.या गाण्यांच्या

तुफान लोकप्रियतेमुळे किशोरकुमार क्रमांक एकचा पार्श्वगायक बनला. या चित्रपटाने हिंदी

चित्रपटसृष्टीला दोन सुपर स्टार्स दिलेत. एक म्हणजे पडद्यावरचा राजेश खन्ना आणि दुसरा

म्हणजे पार्श्वगायकांमधला किशोरकुमार ! तेव्हापासून ते १९८७ पर्यंत किशोरकुमारने पुरुष

पार्श्वगायकाचं सम्राटपद उपभोगलं. पुढे राजेश खन्नाचं पर्व मागे पडून अंग्री यंग man

अमिताभ बच्चन युगाची सुरुवात झाली. इथेही किशोरकुमार होताच. तो आता अमिताभचा

पडद्यावरचा आवाज झाला. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन या दोघांना सुपरस्टार

पदावर पोहचवण्यात त्यांच्यासाठी किशोरने गायलेल्या गाण्यांचा मोठा हातभार लागला.

किशोरकुमारच्या गायकीचा प्रभाव असलेल्या गायकांवर हा एक दृष्टीक्षेप…

अमितकुमार :- किशोरकुमार हयात असतानाच त्याचा मुलगा अमितकुमारने पार्श्वगायक

म्हणून हिंदी सिनेजगतात पदार्पण केलं. १९७३ मध्ये त्याचं पहिलं गाणं ध्वनीमुद्रित झालं

तेव्हा तो अवघ्या २१ वर्षांचा होता. होश में हम कहा…हे ते गाणं.चित्रपट दरवाजा,

संगीतकार होते सपन जगमोहन. पण हा चित्रपट खूप उशिरा म्हणजे १९७८ मध्ये प्रदर्शित

झाला. १९७४ मधल्या ‘जिंदगी और तूफान’ या चित्रपटात त्याने गायलेलं ‘मै भी अकेला हू’

हे त्याचं लोकांसमोर आलेलं पहिलं गाणं ठरलं. त्याने किशोरकुमार सोबत गायलेलं ‘सून

चाचे बोल…’ हे ‘बढती का नाम दाढी’(१९७४) हे गाणं बऱ्यापैकी लोकप्रिय झालं. १९७६

मध्ये त्याला परत वडिलांसोबत गायची संधी मिळाली. दोघांनी ‘हसीनो के चक्कर में …’ हे

गीत ‘दीवानगी’ चित्रपटात गायलं. याच वर्षी आलेल्या ‘बालिका वधू’ या चित्रपटात

अमितकुमारने ‘बडे अच्छे लगते है…’ हे संगीतकार राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं

गाणं गायलं. हे गाणं खूप लोकप्रिय झालं. यामुळे अमितकुमार पार्श्वगायक म्हणून

प्रकाशझोतात आला.आजही हे गाणं अमितकुमारची ओळख बनलेलं आहे. १९७७ मध्ये

तत्कालीन लोकप्रिय रेडीओ कार्यक्रम बिनाका गीतमाला मध्ये हे सर्वाधिक लोकप्रिय गाणं

ठरलं होतं. अमितकुमारने कुमार गौरव या नटासाठी लव्ह स्टोरी, लव्हर्स, रोमान्स, तेरी

कसम या चित्रपटांमध्ये गाणी गायलीत. ती चांगलीच लोकप्रिय झाली होती. म्हणून तो

कुमार गौरवचा पडद्यावरचा आवाज बनला होता. त्याला याद आ रही है..तेरी याद आ रही

है… (लव्ह स्टोरी) या गाण्यासाठी पुरुष गायकाचे फिल्म फेअर पारितोषिक मिळालं होतं.

त्याची ये जमी गा रही है…(तेरी कसम), एक दो तीन…(तेजाब), तिरछी टोपीवाले

(त्रिदेव), कैसा लगता है (बागी), दुश्मन न करे दोस्त ने (आखिर क्यो?), लैला ओ लैला

(कुर्बानी), एक दो तीन, कह दो के तुम हो मेरी वरना (तेजाब), तू रुठा तो मै रो दूंगी

(जवानी), पहले पहले प्यार की, आय एम अ स्ट्रीट डान्सर (इल्जाम), उठे सब के कदम

(बातो बातो में ), हम जिस रस्ते पे चले (तेरी कसम), जिसे प्यार जमाना कहता है (तडप),

मै जिस दिन भभूला दू (पोलीस पब्लिक ), ना बोले तुम (बातो बातो मै ),देखो प्यार में ऐसा

नही करते (होटल) यासारखी अनेक गाणी लोकप्रिय झाली आहेत. त्याने लता-आशा

यांच्यासह कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक, साधना सरगम, अनुराधा पौडवाल बरोबर

अनेक हिट गाणी दिली असून तत्कालीन आघाडीच्या सर्वच संगीतकारांसोबत काम केलं

आहे.

अभिजित :-

अभिजित भट्टाचार्य हा सुद्धा किशोरच्या प्रभावाखाली गाणारा एक बंगाली

गायक. १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मुझे इन्साफ चाहिए’ या चित्रपटात त्याने आशा

भोसले सोबत गायलेलं आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं ‘प्रेमदूत आया..’

हे युगलगीत बऱ्यापैकी लोकप्रिय झालं होतं. त्यानंतर देव आनंद यांनी आपला मुलगा

सुनील आनंदसाठी १९८४ मध्ये ‘आनंद और आनंद’ हा सिनेमा काढला. यात अभिजीतला

गायची संधी मिळाली. पण यातली गाणी फारशी चालली नाहीत. त्याची झांजरिया उसकी

(कृष्णा), आंखो में बसे हो तुम (टक्कर), जरा सा झूम लू मै (दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे),

तुम्हे जो मैने देखा (मै हू ना ), तौबा तुम्हारे ये इशारे, सुनो ना सुनो ना (चलते-चलते ),

वादा रहा सनम (खिलाडी), मै कोई ऐसा गीत गाऊ, चांद तारे तोड लाऊ,जाता है तू कहा

(येस बॉस), प्यार के कागज पे (जिगर), जब भी कोई लडकी देखू (यह दिल्लगी), ये तेरी

आंखे झुकी झुकी (फरेब),इक चंचल शोख हसीना, चांदनी रात है तू मेरे साथ है, हर कसम से

बडी है (बागी),दिल तुज पे आ गया (दिल है के मानता नही ), दरवाजा बंद कर लो (डर),

बडी मुश्कील है (अंजाम), ये प्यार प्यार क्या है (दरार), मुझे प्यार हुआ अल्लामिया

(जुदाई), कसम से कसम से (सनम), हम तो दिवाने हुए यार (बादशाह),ए नाझनी सुनो ना

(दिल ही दिल मै), मरे खायालोंकी मलिका (जोश), तुम्हे जो मैने देखा (मै हू ना), हुस्न है

सुहाना (कुली नंबर 1) अशी अनेक गाणी लोकप्रिय आहेत. १९९८ मधल्या ‘येस बॉस’

चित्रपटातल्या ‘मै कोई ऐसा गीत गाऊ’ या गाण्यासाठी अभिजीतला फिल्म फेअर पुरस्कार

मिळाला आहे. त्याने शाहरुख खान साठी गायलेली गाणी लोकप्रिय झाल्याने मधल्या काही

काळासाठी तो शाहरुखचा पद्यावरचा आवाज झाला होता.

विनोद राठोड :- किशोरदाच्या शैलीत गाणारा अजून एक गायक. रुपकुमार राठोड, श्रवण

राठोड हे त्याचे भाऊ. रुपकुमार गायक तर श्रवण नदीम-श्रवण जोडीतले संगीतकार. श्रवण

यांचं अलीकडेच निधन झालं. राठोड कटुंब मूळचे राजस्थानचं. संगीतकार उषा खन्ना यांनी

विनोद राठोडच्या गाण्याची कॅसेट ऐकून त्याला गायची संधी दिली. चित्रपट होता १९८६

चा ‘दो यार’, गाणं होतं ‘’मरे दिले में है अंधेरा, कोई शमा जला दे’’. या कवाल्ली गाण्यात

मो.अझीझ त्याचा सहगायक होता. दूरचित्रवाणी मालिका ‘आकाशगंगा’ चं शीर्षक गीत ‘’यह

जीवन है आकाशगंगा’’ लोकप्रिय झाल्याने तो प्रकाशझोतात आला. विनोद राठोडने

गायलेली बादल पे चल के आ, जिंदगी हर जनम प्यार की दास्तान (विजय),परबत से काली

घटा टकराई, शहरोमें शहर सुना था दिल्ली (चांदनी), रोमिओ नाम मेरा (रूप की रानी

चोरोंका राजा), ऐसी दिवानगी देखी नही , कोई ना कोई चाहिए (दिवाना ),दिल देने की

ऋत आई (प्रेमग्रंथ), जब से मै जरा सा बदनाम हो गया (गुमराह), नायक नही (खलनायक),

ए मेरे हमसफर, किताबे बहुत सी , समझकर चांद, छुपाना भी नही आता (बाजीगर),

दुनिया ये दुनिया (त्रिमूर्ती), ढोली तारो ढोल बाजे (हम दिल दे चुके सनम),एम बोले तो

(मुन्नाभाई MBBS), मै हू नंबर एक गवय्या (साजन चले ससुराल), अंग से अंग लगाना (डर),

हम अपने घम को , आशिकी में हद से (द जंटलमन), तेरे बिना दिल लगता नही (दिवाना-

मस्ताना ), तेरे मेरे सपने (शीर्षक गीत ), यार ओ यारा (जीत), दुल्हन तो जाएगी(दुल्हे

राजा), समजो हो ही गया (लगे रहो मुन्नाभाई) यासारखी गाणी लोकप्रिय झाली.

शान :- अभिजित, कुमार सानू यांच्याप्रमाणेच किशोरदाचा प्रभाव असलेला हाही एक

बंगाली गायक. याचं खरं नाव शांतनू मुखर्जी. याचे वडील मानस मुखर्जी संगीतकार होते.

एका नेपाळी गाण्यावर बेतलेलं ‘मुसु मुसु हाती’ हे त्याचं ‘प्यार में कभी-कभी’ या

चित्रपटातलं गाणं लोकप्रिय झाल्याने तो नावारूपाला आला. त्याच्या गाण्यांचे अनेक

गैरफिल्मी अल्बम्स निघालेले आहेत. शिवाय त्याने टीव्ही वरील काही गाण्यांच्या

कार्यक्रमात परीक्षक म्हणूनही काम केलं आहे. त्याच्या लोकप्रिय गाण्यांवर ही एक नजर..

कुछ तो हुआ है (कल हो ना हो ), लडकी क्यू लडकोसी (हम तुम), ओ रे कांची (असोका ), ये

हवाए (बस इतना सा खाव्ब है), कोई कहे कहता रहे, वो लडकी है कहा(दिल चाहता है),

सुबह हो गई मामू (मुन्नाभाई MBBS), दस बहाने करले ले गई दिल (दस), बम बम बोले

(तारे जमीं पर), बहेती हवा सा था हो (3 इडियटस), चांद सिफारिश जो करता हमारी

(फना), चार कदम बस (पीके ),हे शोना (ता रा रम पम), रॉक and रोल सोनिये (कभी

अलविदा ना कहना ), वो पहली बार (प्यार में कभी कभी). त्याला ‘जब से तेरे नयना’ या

‘सावरिया’ आणि ‘चांद सिफारिश’ या ‘फना’ चित्रपटातल्या गाण्यांसाठी साठी फिल्मफेअर

पुरस्कार मिळाला आहे. शानने नेपाळी, कन्नडसह इतरही अनेक भाषांमध्ये गाणी गायली

आहेत.

बाबुल सुप्रीयो-

अभिजित, शान आणि कुमार सानू यांच्याप्रमाणे हा देखील बंगाली गायक.

सध्या राजकारणात. काही वर्षे केंद्रीय मंत्रिमंडळात होता . नुकताच त्याने तृणमूल कॉंग्रेस

मध्ये प्रवेश केलाय. १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अग्नीसाक्षी’ चित्रपटात त्याने कविता

कृष्णमूर्ती सोबत गायलेलं ‘ओ पिया ओ पिया प्यार क्यू इतना किया’ या युगलगीताने

प्रकाशझोतात आला. त्याच्या नि कुमार सानूच्या आवाजात बरेच साम्य आहे. त्यामुळे त्याने

गायलेली गाणी कुमार सानूचीच वाटतात. त्याची दिल ने दिल को पुकारा (कहो ना प्यार

है), परी है एक परी (हंगामा), सांसोको सांसोसे (हमतुम), चंदा चमके (फना ), चोरी चोरी

चुपके चुपके (शीर्षक गीत), हमारी शादी में (विवाह), आती है तो चल (सात रंग के सपने),

मैने कोई जादू नही किया (मुझे कुछः कहना है ), हटा सावन की घटा (हॉलो ब्रदर ), जिंदगी

चार दिन की (प्रेमयोग) अशी काही लोकप्रिय गाणी आहेत.

सुदेश भोसले :-

खरं म्हणजे सुदेश भोसले अमिताभ बच्चनच्या आवाजात गाणी गाणारा

गायक म्हणून ओळखला जातो. पण तो देखील ‘स्कूल ऑफ किशोरकुमार’ चा विद्यार्थी आहे.

अनेक कार्यक्रमांमधून त्याने किशोरकुमारची गाणी सादर केली आहेत. स्टेज शो मध्ये तर

त्याने ही गाणी दस्तुरखुद्द लता मंगेशकर आणि आणि आशा भोसले यांच्यासमवेत गायलेली

आहेत. किशोरकुमार शिवाय कुंदनलाल सैगल, सचिनदेव बर्मन, हेमंतकुमार, मन्ना डे यांच्या

आवाजातली गाणी देखील सादर करण्यात त्याचा हातखंडा आहे. सुदेश ‘के फॉर किशोर’ या

टीव्ही शो ची चा निर्माता आणि परीक्षक देखील होता. त्याने अमिताभच्या आवाजात

गायलेली सर्व गाणी हिट झाली आहेत. या शिवाय इमली का बुटा (सौदागर), अंग से अंग

लगाना (डर), भांगडा पाले (करण अर्जुन), लव्ह rap (क्रांतिवीर), ओ लाल दुपट्टेवाली तेरा

नाम तो बता (आंखे), पी ले पी ले ओ मोरे राजा (तिरंगा ), दिल दिया प्यार किया (आर या

प्यार), हृदयी वसंत फुलताना (अशी ही बनवाबनवी ) यासारखी गाणी देखील लोकप्रिय

झाली आहेत.

कुमार सानू :-

किशोरकुमारच्या आवाजाचा आभास निर्माण करणारा आणि स्वत:च्या

सानुनासिक शैलीत गाणारा १९९० ते २००० च्या दशकातला सगळ्यात लोकप्रिय

पार्श्वगायक. याचं खरं नाव केदारनाथ भट्टाचार्य. पुरुष पार्श्वगायनासाठी ओळीने पाच फिल्म

फेअर पुरस्कार मिळवण्याचा विक्रम त्याने केला आहे. अब तेरे बिन जी लेंगे हम

(आशिकी,१९९०), मेरा दिल भी कितना पागल है (साजन,१९९१), सोचेंगे तुम्हे प्यार

(दिवाना, १९९२), ये काली काली आंखे (बाजीगर, १९९४) आणि इक लडकी को देखा (

१९४२ अ लव्ह स्टोरी,१९९४ ) ही ती पाच गाणी. कुमार सानू त्याच्या समकालीन

गायकांपेक्षा फार उजवा होता असं नाही. पण त्याच्या आवाजाची जबरदस्त मोहिनी

श्रोत्यांना पडली होती. १९८७ मध्ये किशोरदा गेल्यावर अवघ्या तीनच वर्षात म्हणजे

१९९० पासून कुमार सानू तुफान लोकप्रिय व्हायला सुरुवात झाली होती. या मागे गुलशन

कुमारच्या टी-सरीज कॅसेट कंपनीचा देखील मोठा हातभार होता. कुमार सानू-नदीम श्रवण-

टी सीरीज या त्रिकुटाने हिंदीत सिनेजगतात अक्षरशः अधिराज्य केलं. कुमार सानूच्या

कारकीर्दीचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र लेख लिहावा लागेल.

सर्वसाधारणपणे एकाच कालखंडात एकाच गायकाने प्रभावित झालेले एवढे गायक

असावेत, हा एक चमत्कारच म्हटला पाहिजे. यावरून हे लक्षात येतं की किशोरकुमार

नावाच्या गायकाच्या आवाजाची मोहिनी किती विलक्षण होती ती. किशोरच्या आवाजाची

कधी नक्कल करून तर कधी त्याच्या शैलीचं अनुकरण करून तर कधी त्याला आदर्श-

गुरुस्थानी मानून या गायकांनी आपली कारकीर्द घडवली. पैकी अभिजित या गायकाचा

आवाज थेट किशोरसारखा नाही. त्याच्या स्वत:च्या आवाजात तो गायचा. या गायकांमध्ये

बंगाली गायक अधिक आहेत. यावरून बंगाली जनतेत किशोरदा किती लोकप्रिय आहेत

याचा प्रत्यय येतो. ! ‘झाले बहुत होतील बहुत पण या सम हाच’ याच शब्दांत किशोरकुमार

या महान गायकाचं वर्णन करता येईल. किशोरदाच्या स्मृतीला विनम्र अभिवादन !

प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार

सहयोगी प्राध्यापक,

मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखा,

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,

नाशिक

मोबाईल : ९४०३७७४५३०

- Advertisment -

ताज्या बातम्या