नाशिक | प्रतिनिधी Nashik
राष्ट्रीय महिला आयोग, महिला व बालविकास विभाग, ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या सूचनेनुसार महिला दिनानिमित्त शनिवारी दि. ८ मार्च २०२५ रोजी संपूर्ण राज्यासह नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत “विशेष ग्रामसभा” आयोजित करण्यात येणार आहे.
या ग्रामसभेच्या निमित्ताने बालविवाहास प्रतिबंध घालणे, विधवा स्त्रियांबाबत असलेल्या अनिष्ट रूढी व परंपरांना पायबंद घालणे, मुलींच्या जन्म दरात वाढ करण्यासाठी जनजागृती करणे, महिलांच्या सन्मानासाठी विशेष प्रयत्न करणे याबाबत चर्चा होणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
नाशिक जिल्ह्यातील १३८८ ग्रामपंचायत मध्ये ही विशेष महिला ग्रामसभेचे आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा व नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
ही विशेष ग्रामसभा राज्यातील महिलांच्या उन्नतीसाठी दिशादर्शक ठरण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने यांनी केले आहे.