नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिक जिल्हा कॅरम असोसिएशनच्या Nashik District Carrom Association वतीने आणि क्रीडा संस्कृती फाऊंडेशनच्या सहकार्याने लोकनेता गोपीनाथराव मुंडे स्मृती चषक नाशिक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा नुकत्याच झाल्या.
या स्पर्धेत 14 वर्षे मुले-मुली, 17 वर्षे मुले- मुली आणि 19 वर्षे मुले- मुली या तीन गटांचा समावेश होता. तसेच दुहेरी (डबल्स) प्रकाराचाही समावेश करण्यात आला होता. या स्पर्धेत नाशिक जिल्हाभरातून 137 स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला. या स्पर्धेत मुलांमध्ये राष्ट्रीय खेळाडू अय्यान पिरजादेने आपल्या दर्जाला साजेसा खेळ करून दुहेरीमध्ये दुसरा क्रमांक मिळवला. अय्यानने 17 वर्षे आणि 19 वर्षे गटात विजेतेपद मिळवले तर दुहेरीमध्ये उपविजेतेपद मिळवले.
या स्पर्धेत 14 वर्षे मुलांच्या गटात उत्कर्ष परदेशीने अंतिम लढतीत ईशान शिरपूरकरला पराभूत करून विजेतेपद पटकावले.
मुलींमध्ये 14 वर्षे गटात झालेल्या अंतिम सामन्यात प्राची मनवरने सुरुवातीपासून चांगला खेळ करून ऋतुजा पिंगळेला पराभूत करून विजेतेपद मिळवले. तर दिव्या सुर्वे आणि सृष्टी अमृतकर यांनी संयुक्त तिसरा क्रमांक मिळवला.
17 वर्षे गटाच्या मुलींच्या अंतिम सामन्यात राष्ट्रीय खेळाडू कल्याणी बोंडेने आपल्या दर्जाला साजेशा खेळाचे प्रदर्शन करून विजेतेपद मिळवले, तर भूमिका देसलेने दुसरा क्रमांक मिळवला.
19 वर्षे मुलींमध्ये चांगली चुरस दिसून आली. अंतिम लढतीत अत्यंत चुरशीच्या रंगलेल्या सामन्यात सिद्धी पवार हिने राष्ट्रीय खेळाडू कल्याणी बोंडेच्या दबावाला बळी न पडता शेवटच्या काही मिनिटांमध्ये तीन गुणांची आघाडी मिळवत अंतिम लढत जिंकून या गटाचे विजेतेपद मिळवले तर कल्याणीला दुसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
मुलांच्या दुहेरी स्पर्धेतही चांगली चुरस दिसून आली. गत स्पर्धेत अंतिम फेरीत एकमेकांसमोर खेळलेल्या जोडीचीच या स्पर्धेत अंतिम लढत पार पडली. यावेळी मात्र गत स्पर्धेतील उपविजेत्या भूषण भटाटे आणि नकुल चावरे या जोडीने एकमेकांमध्ये चांगला समन्वय राखून या चुरशीच्या लढतीत चार गुणांच्या फरकाने हा सामना जिंकून विजेतेपद पटकावले. तर अय्यान पिरजादे आणि रौफ पिरजादे यांना दुसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धाचा पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते अभिषेक तांदळे, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त फेन्सिंगचे खेळाडू अक्षय देशमुख, क्रीडा संघटक आनंद खरे, व्हॉलीबॉलचे राष्ट्रीय खेळाडू अमोल कांबळे, क्रीडा प्रशिक्षक संतोष पवार यांच्या हस्ते पार पडला. सूत्रसंचालन अभिषेक मोहिते आणि अमोल चांदवडकर यांनी केले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उमेश सेनभक्त, अभिषेक मोहिते, भूषण भटाटे, नकुल चावरे, नीरज कुर्हाडे, अमोल चांदवडकर, प्रथमेश ठाकरे, गायात्री वाघ, नेहा मनवर, नेहा वाळुंज, गायत्री चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.