नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
ऑस्ट्रेलियातील (Australia) सिडनी मैदानावर खेळविण्यात आलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) यांच्यातील पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ६ गडी राखून विजय संपादन केला. तसेच ५ सामन्यांची मालिका ३-१ ने जिंकली आहे. विशेष म्हणजे १० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाने बॉर्डर गावस्कर चषकावर आपले नांव कोरले आहे.
रविवारी भारतीय संघाने (Team India) ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १६२ धावांचे आव्हान दिले होते. धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर आलेल्या ऑस्ट्रेलियाने ६ गडी राखून विजय संपादन केला आहे. ऑस्ट्रेलियाकडून ब्यू वेब्स्टर ३९, ट्रॅव्हिस हेड ३४, उस्मान ख्वाजा ४१ आणि सॅम कॉंन्टांसने २२ धावा केल्या. भारतीय संघाकडून प्रसिध्द कृष्णाने ३ तर मोहम्मद सिराजने १ गडी बाद केला.
त्याआधी भारतीय संघाने दुसऱ्या डावात १५७ धावा केल्या होत्या.यात ऑस्ट्रेलियाकडून ब्यू वेब्स्टरने १ तसेच पॅट कमिन्सने ३ तर स्कॉट बोलंडने ६ गडी बाद केले. या स्पर्धेत स्कॉट बोलंड सामनावीर तर जसप्रीत बुमराह मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. आयसीसी कसोटी (ICC Test) अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया संघाने दुसऱ्यांदा प्रवेश केला आहे. तर अंतिम सामना दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध ११ ते १५ जून रोजी लॉर्ड्स स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे.