नवी दिल्ली | New Delhi
टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये (ICC T 20 World Cup) साखळी फेरीचा थरार आटोपल्यानंतर शनिवार (दि. २१) पासून सुपर ८ लढतींना प्रारंभ झाला. रविवारी (दि. २२) अहमदाबाद येथील श्री नरेंद्र मोदी मैदानावर (Narendra Modi Ground) सायंकाळी ७ वाजता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना रंगणार असून भारतीय संघासमोर दक्षिण आफ्रिकेचे तगडे आव्हान असणार आहे. भारतीय संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे तर अॅडम मार्करम दक्षिण आफ्रिका संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये (India vs South Africa) चुरशीची लढत क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. साखळी फेरीत दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तान, कॅनडा, अमिराती आणि न्यूझीलंड विरुद्ध सलग ४ सामन्यात विजय संपादन करून गुणतालिकेत अव्वल स्थान निश्चित केले आहे. तर दुसरीकडे भारतीय संघ देखील जबरदस्त लयीत आहे. नेदरलँड्स, पाकिस्तान, अमेरिका आणि नामिबिया संघाला चारीमुंड्या चीत केल्यानंतर भारतीय संघ आता सुपर-८ मध्ये दक्षिण आफ्रिका संघाला पराभवाची धूळ चारण्यासाठी उत्सुक आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघांमध्ये ३१ सामने (Match) खेळले गेले असून, हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास भारतीय क्रिकेट संघाचा वरचष्मा राहिला आहे. १८-१२ अशा फरकाने भारतीय संघाने सरशी साधली आहे. एक सामना रद्द करण्यात आला आहे.विश्वचषक स्पर्धेत ७ सामने खेळले असून, भारतीय संघ ५-२ ने आघाडीवर आहे. विशेष म्हणजे आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये बार्बाडोस येथे रंगलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवला होता. या पराभवाची परतफेड करण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघ प्रयत्न करणार आहे.
भारतीय संघासाठी चिंतेची बाब म्हणजे सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माला यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये आपल्या अपेक्षेनुसार कामगिरी करता आलेली नाही. तीन सामन्यात त्याला भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामुळे सुपर-८ मध्ये अभिषेक शर्मा मोठी खेळी साकारण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. तसेच फलंदाजीमध्ये सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्धा, शिवम दुबे, ईशान किशन हे सर्व फलंदाज जबरदस्त लयीत आहेत.
गोलंदाजीत चरुण चक्रवर्ती, अर्शदीपसिंग, शिचम दुबे, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या हे सर्व गोलंदाज सातत्याने संघाला बळी मिळवून देत आहेत. दक्षिण आफ्रिका संघाबद्दल बोलायचे झाल्यास अॅडम मार्करम, किंटन डी कॉक, रायन रिकलटन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टबज आपल्या फलंदाजीतून महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत, गोलंदाजीत लुंगी इंगिडी, माको बानसेन, कगिसो रबाडा, कॉबिन बॉश या सर्व गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे.
मोहम्मद सिराजला दुखापत
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. महंमद सिराजला नेटमध्ये सराव करत असताना दुखापत झाली. साखळी फेरी आटोपल्यानंतर भारतीय संघाने एक दिवस विश्रांती घेऊन पुन्हा एकदा सरावाला सुरुवात केली. अष्टपैलू हार्दिक पांड्धाने महंमद सिराजच्या गोलंदाजीवर जोरदार फटका मारला की तो थेट त्याच्या गुडघ्यावर लागला. सिराजला झालेली दुखापत पाहून संघाच्या मेडिकल सपोर्ट स्टाफने ताबडतोब हजेरी लावली, महंमद सिराजच्या गुडघ्यावर बर्फ लावला आणि काही वेळ तपासणी केली. यानंतर सिराज स्वतः पायाबर उठून उभा राहिला. सिराजची दुखापत गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अष्टपैलू हर्षित राणा दक्षिण आफ्रिका विरुद्ध सराव सामन्यात दुखापतग्रस्त झाल्याने त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले होते.
क्विंटन डी कॉकला इतिहास रचण्याची संधी
दक्षिण आफ्रिका संघाचा डावखुरा सलामीवीर यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकला या सामन्यात इतिहास रचण्याची संधी आहे. क्लिंटन डी कॉकने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून ३२१ सामन्यात २९५ षटकार ठोकले असून, अजून ५ षटकार खेचले तर त्याला ३०० षटकार पूर्ण करण्याची संधी असणार आहे. क्लिंटन डी कॉकने हा कारनामा केल्यास तो दक्षिण आफ्रिका संघाचा दुसरा आणि जगातील १४ वा क्रिकेटपटू ठरेल. दक्षिण आफ्रिका संघाकडून यष्टीरक्षक फलंदाज अब्राहम डिव्हिलियर्सने ४२० इनिंगमध्ये ३२८ षटकार खेचले आहेत. विश्वचषक स्पर्धेमध्ये क्लिंटन डी कॉकने ४ सामने खेळले असून, ११८ धावा केल्या आहेत. ५९ हा त्याचा सर्वोत्तम स्कोअर आहे. तसेच भारताविरुद्ध कायमच त्याची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. १४ इनिंगमध्ये ५०७ धावा केल्या असून, ६ अर्धशतके झळकावली आहेत.





