Saturday, November 7, 2026
Homeक्रीडाIND vs NZ : पावसाच्या सावटात भारताचा रोमहर्षक विजय; न्यूझीलंडवर ४ धावांनी...

IND vs NZ : पावसाच्या सावटात भारताचा रोमहर्षक विजय; न्यूझीलंडवर ४ धावांनी मात करत मालिकेत २-० ने आघाडी

नवी दिल्ली | New Delhi

कर्णधार शुभमन गिलच्या (Shubhman Gill) नेतृत्वाखालील भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) दुसऱ्या सामन्यात डकवर्थ-लुईस (DLS) नियमानुसार ४ धावांनी विजय मिळवला आहे. वेलिंग्टन येथील स्काय क्रिकेट मैदानावर शनिवारी (७ नोव्हेंबर) खेळवण्यात आलेल्या या सामन्यातील विजयामुळे भारतीय संघाने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अजिंक्य आघाडी घेत मालिका विजयावर आपला दावा मजबूत केला आहे.

- Advertisement -

गोलंदाजांची प्रभावी कामगिरी; न्यूझीलंड १३४ धावांवर ऑलआऊट

ओल्या आऊटफिल्डमुळे सामना नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिराने सुरू झाला, ज्यामुळे पंचांनी सामना प्रत्येकी ४१ षटकांचा (३-३ षटके कपात) करण्याचा निर्णय घेतला. भारताने (Team India) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत न्यूझीलंडचा पहिला डाव ४१ षटकांत १३४ धावांवर रोखला.

न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेलने सर्वाधिक ५५ धावांची झुंज दिली, तर मिचेल सँटनरने ३१ धावांचे योगदान दिले. या दोघांनी सहाव्या विकेटीसाठी ५९ धावांची भागीदारी रचून संघाला शंभरचा टप्पा पार करून दिला. भारताकडून गुरनूर ब्रारने सर्वाधिक ४ बळी घेतले, तर अक्षर पटेल, आकिब नाबी आणि अंशुल कंबोज यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद करत त्याला उत्तम साथ दिली.

आघाडीचे फलंदाज अपयशी; अय्यर व राहुलने सावरला डाव

१३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. न्यूझीलंडच्या जेकब डफी आणि काईल जेमिसन (प्रत्येकी ३ बळी) यांनी भारताची आघाडीची फळी मोडून काढली. कर्णधार शुभमन गिल (०), विराट कोहली (७) आणि रोहित शर्मा (२३) स्वस्तात बाद झाल्याने भारत अडचणीत सापडला होता.त्यानंतर श्रेयस अय्यर (३०) आणि यष्टीरक्षक फलंदाज के. एल. राहुल (२६) यांनी संयमी फलंदाजी करत भारताचा डाव सावरला.

डकवर्थ-लुईस नियमाने भारताला विजय घोषित

भारताने ७ बाद ११३ धावा केल्या असताना मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि खेळ थांबवण्यात आला. सामना थांबला तेव्हा डकवर्थ-लुईस नियमानुसार विजयासाठी भारताची धावसंख्या १०९ असणे आवश्यक होते. भारतीय संघ नियमानुसार आवश्यक धावसंख्येपेक्षा ४ धावांनी पुढे असल्याने पंचांनी भारताला ४ धावांनी विजयी घोषित केले.

तिसरा सामना हॅमिल्टनवर

या विजयासह भारतीय संघाने मालिकेत २-० अशी आघाडी घेत मालिकेवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना मंगळवारी, १० नोव्हेंबर रोजी हॅमिल्टन येथील मैदानावर खेळवला जाईल.

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, दोन्हीही स्वतंत्र…

0
मुंबई | Mumbaiराष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. प्रफुल...