Wednesday, November 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजIND vs NZ : भारताची न्यूझीलंडवर ५ गडी राखून मात; विराटच्या नावावर...

IND vs NZ : भारताची न्यूझीलंडवर ५ गडी राखून मात; विराटच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद

नवी दिल्ली | New Delhi

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आजपासून (दि.०४ नोव्हेंबर) पासून ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला ऑकलंड येथील ईडन पार्क मैदानावर दिमाखात सुरुवात झाली. या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने (Team India) ५ गडी राखून विजय संपादन करत मालिकेत १-० ने विजयी आघाडी घेतली. भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा आणि पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार बदललेल्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी मोलाचे योगदान दिले. या विजयात अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार, अंशुल कंबोज आणि विराट कोहली यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

- Advertisement -

न्यूझीलंडचा डाव १८५ धावांवर संपुष्टात

या सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने (Shubhman Gill) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाच्या धारदार आणि अचूक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज गडगडले आणि त्यांचा संपूर्ण डाव ४०.२ षटकांत अवघ्या १८५ धावांवर आटोपला. न्यूझीलंडकडून टीम सॅफ्रीटने ३८, ग्लेन फिलिप्सने ३०, तर डॅरेल मिचेलने २८ धावा केल्या.

भारतीय गोलंदाजांचा कहर

भारताकडून अर्शदीप सिंगने ४ गडी बाद करत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. न्यूझीलंडविरुद्ध न्यूझीलंडच्याच भूमीवर एकाच एकदिवसीय डावात ४ किंवा त्याहून अधिक गडी बाद करणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी मोहम्मद शमी आणि माजी गोलंदाज जवागल श्रीनाथ यांनी हा कारनामा केला होता. अर्शदीपशिवाय गुरनूर ब्रारने ३ आणि अंशुल कंबोजने २ बळी टिपले. तसेच, रोहित शर्माने क्षेत्ररक्षणादरम्यान केलेल्या अचूक डायरेक्ट थ्रो आणि विराट कोहलीने एका हाताने टिपलेल्या सुरेख झेलामुळे न्यूझीलंडच्या डावाला मोठी कलाटणी मिळाली.

विराट कोहली आणि शुभमन गिलची महत्त्वपूर्ण भागीदारी

प्रत्युत्तरात १८६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आणि सलामीवीर रोहित शर्मा खाते न उघडता शून्यावर बाद होऊन तंबूत परतला. दरम्यान, भारतीय डावात पावसामुळे दोनदा व्यत्यय आला, त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार भारतासमोर विजयासाठी ३२ षटकांत १४३ धावांचे संशोधित आव्हान ठेवण्यात आले. रोहित लवकर बाद झाल्यानंतर कर्णधार शुभमन गिलने विराट कोहलीसोबत मिळून दुसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत आणले. शुभमन गिल ३७ धावा काढून बाद झाला, तर विराट कोहलीने ७४ धावांची धडाकेबाज खेळी केली.

विराटच्या नावावर नवा विक्रम

या खेळीदरम्यान विराटने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले. त्याने एकदिवसीय क्रिकेटमधील आपले ८० वे अर्धशतक पूर्ण केले. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १३,००० धावा पूर्ण करणारा तो जगातील सर्वात वेगवान फलंदाज ठरला.तसेच धावांचा पाठलाग करताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करत त्याने सचिन तेंडुलकरला (८,७२० धावा) मागे सोडले. विराट कोहली आता पाठलाग करताना ८,७४१ धावांसह जगभरात पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

नमन धीर आणि के.एल. राहुलने मिळवून दिला विजय

विराट कोहली बाद झाल्यानंतर अक्षर पटेल शून्यावर आणि श्रेयस अय्यर १५ धावा काढून बाद झाले. परंतु, त्यानंतर फलंदाजीला आलेल्या नमन धीरने यष्टीरक्षक फलंदाज के.एल. राहुलला सोबत घेऊन संघाचा विजय निश्चित केला. भारतीय संघाने हे लक्ष २२.४ षटकांत सहज पार केले. न्यूझीलंडकडून जेकब डफीने ३, तर काईल जेमिसन आणि नॅथन स्मिथने प्रत्येकी १ गडी बाद केला.

ताज्या बातम्या

Maharashtra Cabinet Meeting : विद्यार्थी, शेतकरी, वाहनधारक अन् सहकारी क्षेत्रासाठी महत्त्वाच्या...

0
मुंबई | Mumbai मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज (बुधवार दि.०४) रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात...