नवी दिल्ली | New Delhi
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील सुवर्णपदकाच्या अंतिम सामन्यात भारताने (Team India) पाकिस्तानचा (Pakistan) धुव्वा उडवला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा २० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने पाकिस्तानसमोर (Pakistan) २१२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानांचा पाठलाग करताना पाकिस्तानने सुरुवातीला चांगली खेळी केली. मात्र नंतर फलंदाजी ढेपाळल्याने भारताने २० धावांनी विजय मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरले.
आजच्या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय फलंदाजांनी पूर्णपणे सार्थकी ठरवला. भारताच्या डावाची सुरुवात वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्माने केली. यात सूर्यवंशीने ९ चेंडूंत दोन षटकारांच्या मदतीने १५ धावा केल्या. तर अभिषेक शर्माने (Abhishekh Sharma) पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करत अवघ्या २० चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. हे त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १३ वे अर्धशतक होते. अभिषेकने २८ चेंडूंमध्ये ३ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ६१ धावांची वादळी खेळी केली.
दरम्यान, संजू सॅमसन ४ चेंडूंमध्ये २ धावा करून माघारी परतल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने २४ चेंडूंमध्ये २१ आणि इशान किशनने १८ चेंडूंमध्ये २० धावांची खेळी केली. यानंतर शेवटच्या टप्प्यात तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांनी भारताच्या डावाला मोठी धावसंख्या मिळवून देण्यात हातभार लावला. शिवम दुबेने २७ तर तिलक वर्माने नाबाद ५१ धावांची खेळी केली. त्यामुळे भारत २० षटकांत ६ गडी गमावून २११ धावापर्यंत पोहोचला.




