Saturday, November 14, 2026
Homeमुख्य बातम्याUnder 19 Asia Cup Final : अंतिम सामन्यात भारताचा पाकिस्तानवर थरारक विजय;...

Under 19 Asia Cup Final : अंतिम सामन्यात भारताचा पाकिस्तानवर थरारक विजय; नवव्यांदा आशिया चषकावर कोरले नाव

नवी दिल्ली | New Delhi

अंडर-१९ आशिया कप २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात (Aisa Cup Final) भारताने (Team India) पाकिस्तानवर शेवटच्या षटकात थरारक विजय मिळविला आहे. पाकिस्तानने भारताला (Team India) विजयासाठी दिलेल्या ३३८ धावांचा पाठलाग करताना भारताने हे आव्हान ९ गडी बाद ३३९ धावा करत पूर्ण केले. या विजयामुळे भारताने नवव्यांदा आशिया कपच्या चषकावर नाव कोरले.

- Advertisement -

दरम्यान नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने निर्धारित ५० षटकांत ९ गडी गमावून ३३७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारताच्या डावाची सुरुवात लक्ष रायचंदानी आणि आर्यवीर सेहवाग यांनी केली. रायचंदानी याने ८० तर सेहवागने ५८ धावांची धमाकेदार खेळी केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी रचून संघाला भक्कम सुरुवात करून दिली. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या व्ही के विनित सोबत 51धावा वसूल करून संघाला 140 चा टप्पा ओलांडून दिला.

व्ही के विनित 24 धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर अर्जुन राजपूतने लक्ष रायचंदानी सोबत डावाची सुत्रे हाती घेतली. अर्जुन राजपूत 16, यशवर्धन चौहान 9, अन्वय द्रविड 19, लक्ष रायचंदानी 80 धावा काढून तंबूत परतल्यानंतर 217 धावांवर 6 गडी गमावून भारताचा डाव संकटात सापडला होता. त्यामुळे सामन्यावर पाकिस्तानची पकड मजबूत दिसत होती.

मात्र मनल चौहान 47 आणि मोहित उलवा 49 यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे सामन्यात रंगत आणल्याने भारतीय संघाच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर 3 धावांची गरज असताना मोहित उलवाने चौकार खेचून भारतीय संघाला ऐतिहासिक विजय संपादन करून दिला. पाकिस्तानने (Pakistan) दिलेल्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी जबरदस्त लढाऊ बाणा दाखवला. पाकिस्तानकडून निकाब शकीब ने 2 तर रिझवानुलला 3 गडी बाद केले.

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला थरार

विजयासाठी ३३८ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने सुरुवातीपासूनच झुंजार खेळ केला. या महत्त्वाच्या सामन्यात मनल चौहान आणि मोहित उल्वा यांनी निर्णायक आणि जबाबदार खेळी करत संघाला विजयाच्या समीप नेले. सामना इतका अटीतटीचा झाला की विजयाचा फैसला अखेरच्या चेंडूपर्यंत गेला. शेवटच्या १ चेंडूवर भारताला विजयासाठी ३ धावांची गरज होती. दबावाखाली न येता मोहित उल्वाने खणखणीत चौकार मारला आणि संपूर्ण स्टेडियममध्ये एकच जल्लोष सुरू झाला.

मागील पराभवांचा काढला वचपा

या स्पर्धेच्या ग्रुप स्टेजमधील सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभूत केले होते, तसेच मागील वर्षाच्या फायनलमध्येही भारताला हार पत्करावी लागली होती. मात्र, या अंतिम सामन्यात दमदार विजय मिळवत टीम इंडियाने मागील सर्व पराभवांचा व्याजासह वचपा काढला आणि आशिया कपची ट्रॉफी उंचावली.

पाकिस्तानने केली होती दमदार सुरुवात

पाकिस्तानने (Pakistan) नाणेफेक जिंकून फलंदाजीचा घेतलेला निर्णय त्यांच्या फलंदाजांनी सार्थ ठरवला. सलामीवीर उस्मान खानने १११ चेंडूंत ३ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने १०७ धावांची धमाकेदार शतकी खेळी केली. उस्मान खान आणि हयाम खान (२१ धावा) यांनी अर्धशतकी भागीदारी करत आश्वासक सुरुवात केली. त्यानंतर उस्मान आणि अब्दुल कादीर यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११३ चेंडूंत १३५ धावांची आक्रमक भागीदारी केली.

अब्दुल कादीरने अवघ्या ५४ चेंडूंत ८० धावांची तडाखेदार खेळी केली. तर कर्णधार फरहान युसुफने ६० चेंडूंत ६३ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. पहिल्या ३० षटकांत पाकिस्तानी फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले होते. ३० षटकांपर्यंत पाकिस्तानने २०० धावांचा टप्पा ओलांडला होता आणि त्यांच्या हातात ८ गडी शिल्लक होते. त्यामुळे पाकिस्तान ३७० ते ३८० धावांपर्यंत मजल मारेल असे वाटत होते. परंतु ते ३३८ धावांपर्यंत पोहोचू शकले.

ताज्या बातम्या

बँकेतील लाखो रुपयांच्या चोरीचा उलगडा; अंबड पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik बँकेच्या कामासाठी सोबत असलेल्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनीच विश्वासघात करत १४ लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार उघडकीस...