Monday, November 16, 2026
Homeक्रीडाIND vs NZ : भारत-न्यूझीलंड टी-२० मालिका २२ ऑक्टोबरपासून; श्रेयस अय्यरकडे भारतीय...

IND vs NZ : भारत-न्यूझीलंड टी-२० मालिका २२ ऑक्टोबरपासून; श्रेयस अय्यरकडे भारतीय संघाचे नेतृत्व

मुंबई | Mumbai

वेस्ट इंडिजविरुद्धची टी-२० मालिका आटोपल्यानंतर, भारतीय संघ आता न्यूझीलंडचे (India-New Zealand) आव्हान झेलण्यासाठी सज्ज झाला आहे. २२ ऑक्टोबरपासून दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची रोमांचक मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना क्राईसचर्च येथील हेगले ओव्हल मैदानावर (Graund) भारतीय वेळेनुसार दुपारी १२:३० वाजता खेळविण्यात येईल. या मालिकेचे न्यूझीलंडचे कर्णधारपद मिचेल सँटेनर यांच्याकडे सोपविण्यात आले असून, सामन्याचे थेट प्रक्षेपण ‘सोनी टेन’ आणि ‘सोनी लिव्ह’वर होणार आहे.

- Advertisement -

न्यूझीलंड संघाला दुखापतींचा फटका

या टी-२० मालिकेपूर्वी न्यूझीलंड संघाला दुखापतींच्या समस्येचा सामना करावा लागला आहे. मार्क चॅपमन, रचिन रवींद्र आणि झॅक फॉलक्स हे प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त असल्यामुळे या मालिकेत खेळू शकणार नाहीत. त्यांच्या जागी पर्यायी खेळाडू म्हणून जोश क्लार्कसन आणि ब्लेर टिकनेर यांची संघात निवड करण्यात आली आहे.

भारतीय संघात महत्त्वाची पुनरागमने

दुसरीकडे, भारतीय संघात (Team India) अनुभवी मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार तब्बल ४ वर्षांनंतर पुनरागमन करत आहे. त्याचप्रमाणे, मिस्ट्री फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती दुखापतीवर यशस्वी मात करून संघात परतला आहे. भारतीय संघाला आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध परदेशात खेळल्या गेलेल्या दोन्ही मालिकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे न्यूझीलंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करणे भारतीय संघासमोर मोठे आव्हान असणार आहे.

दोन्ही संघांमधील आकडेवारी आणि इतिहास

भारत आणि न्यूझीलंड संघात आतापर्यंत एकूण ३१ टी-२० सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारतीय संघ १९-११ अशा फरकाने आघाडीवर आहे. तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. न्यूझीलंडमध्ये दोन्ही संघांमध्ये १२ टी-२० सामने झाले आहेत, जिथे न्यूझीलंडचा संघ ५-७ असा पिछाडीवर आहे. तसेच न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत ६ टी-२० मालिका खेळविण्यात आल्या असून, दोन्ही संघांनी ३-३ मालिका जिंकत बरोबरी साधली आहे. क्राईसचर्च येथे एकमेव टी-२० सामना २६ फेब्रुवारी २००९ रोजी खेळवला गेला होता, ज्यामध्ये न्यूझीलंडने ७ गडी राखून विजय मिळवला होता. ८ मार्च २०२६ रोजी अहमदाबाद येथील आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ आमनेसामने आले होते. त्या ऐतिहासिक सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने ९६ धावांनी दणदणीत विजय मिळवून विश्वचषक उंचावला होता.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 2006 च्या दिव्यांग भरतीतील 70 शिक्षकांची मूळ फाईलच गायब

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील 2006 मधील विशेष दिव्यांग शिक्षक भरतीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. या भरतीशी संबंधित 70 शिक्षकांच्या मूळ...