मुंबई | Mumbai
इंडियन प्रीमियर लीग (IPL) क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (दि. २०) अहमदाबाद येथील श्री नरेंद्र मोदी मैदानावर मुंबई इंडियन्स संघाचा सामना गुजरात टायटन्स (Mumbai Indians and Gujarat Titans) विरूद्ध सायंकाळी ७.३० वाजता खेळविण्यात येणार आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत आव्हान कायम राखण्यासाठी मुंबई इंडियन्स संघाला विजय अनिवार्य असणार आहे.
मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) असणार आहे. तर गुजरात टायटन्सची धुरा शुभमन गिलकडे असणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये ८ सामने उभय संघांमध्ये पार पडले असून, गुजरात टायटन्सने ५-३ फरकाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. अहमदाबाद येथील श्री नरेंद्र मोदी मैदानावर ५ सामने खेळले असून, गुजरात टायटन्सने ४ सामन्यात विजय संपादन केला आहे.
गुजरात टायटन्स संघाला गतवर्षी एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने पराभूत करून उपांत्य फेरीत आपला प्रवेश निश्चित केला होता. या पराभवाची परतफेड करण्याची संधी गुजरात टायटन्सकडे असणार आहे. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्स संघाचा माजी कर्णधार आणि विस्फोटक सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) अद्याप हॅमस्ट्रिंग दुखापतीतून पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. त्यामुळे त्याच्या सहभागावर प्रश्नचिन्ह कायम आहे.





