नवी दिल्ली | New Delhi
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये (Pakistan-Afghanistan) सशस्त्र संघर्ष सुरु आहे. काल (शुक्रवारी) पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात ४८ तासांची शस्त्रसंधी झाली होती. मात्र, रात्री पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या पाठीत खंजीर खुपसत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील पक्तिका प्रांतामधील उरगुन जिल्ह्यात हवाई हल्ला (Airstrike) केल्याने या हल्ल्यात तीन अफगाण क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कबीर, सिबगतुल्लाह आणि हारून या तीन स्थानिक क्लब क्रिकेटपटूंसह आठ जणांचा मृत्यू झाला असून,चार जण जखमी झाले आहेत. या घटनेबद्दल अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच पाकिस्तानच्या या निर्दयी कृतीने केवळ अफगाणिस्तानच नव्हे, तर संपूर्ण क्रिकेटविश्व हादरले आहे. त्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
अफगाणिस्तानची तिरंगी टी-२० मालिकेतून माघार
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पक्तिकाच्या हवाई हल्ल्यात देशांतर्गत खेळाडूंचा मृत्यू झाल्यानंतर पाकिस्तान आणि श्रीलंकेसोबत तिरंगी मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एक अधिकृत निवेदन जारी केले आहे की, “पाकिस्तानी राजवटीने केलेल्या भ्याड हल्ल्यात लक्ष्य झालेल्या पक्तिका प्रांतातील उरगुन जिल्ह्यातील शूर क्रिकेटपटूंच्या शहीदतेबद्दल अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड तीव्र शोक व्यक्त करतो. आणि पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यासोबत होणाऱ्या टी-२० तिरंगी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही मालिका २० नोव्हेंबरपासून सुरु होणार होती.




