नवी दिल्ली | New Delhi
भारत आणि न्यूझीलंड (India and New Zealand) यांच्यात सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज (शनिवारी, २४ ऑक्टोबर) क्राईसचर्च येथील हेगले ओव्हल मैदानावर भारतीय वेळेनुसार दुपारी १२:३० वाजता खेळवला जाणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण ‘सोनी लिव्ह’ (Sony LIV) वर पाहता येणार आहे. या मालिकेत भारतीय संघाने श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वात पहिल्या सामन्यात ४ गडी राखून दणदणीत विजय मिळवत विजयी सलामी दिली आहे.
ईशान किशन दुखापतीमुळे बाहेर
सामना सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज ईशान किशन दुखापतग्रस्त झाल्यामुळे दुसऱ्या सामन्यातून बाहेर झाला आहे. पहिल्या टी-२० सामन्यादरम्यान त्याच्या उजव्या पायाच्या मांडीच्या स्नायूंमध्ये ताण (Low grade right adductor strain) जाणवल्याने त्याने हा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
वैभव सूर्यवंशीला संधी मिळण्याची शक्यता
ईशान किशनच्या (Ishan Kishan) जागी पर्यायी खेळाडू म्हणून १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला अंतिम ११ मध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
मालिकेत पकड मजबूत करण्यासाठी टीम इंडिया मैदानात
पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर आता दुसऱ्या सामन्यातही विजय संपादन करून मालिकेत आपली पकड अधिक घट्ट करण्याचा भारतीय संघाचा मानस असेल. दुसरीकडे, मिचेल सँटेनरच्या नेतृत्वात न्यूझीलंड संघ पहिल्या सामन्यातील पराभवानंतर दमदार पुनरागमन करून मालिकेत बरोबरी साधण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.विशेष म्हणजे, क्राईसचर्चच्या या मैदानावर आतापर्यंत उभय संघांमध्ये २ सामने खेळवले गेले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी १ सामना जिंकत बरोबरीत आहेत. त्यामुळे आजचा सामना अत्यंत रोमांचक होण्याची शक्यता आहे.




