मुंबई | Mumbai
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीत मोठे फेरबदल केले आहेत. अजित आगरकर (Ajit Aagarkar) यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर, बीसीसीआयने ज्येष्ठ सदस्य प्रज्ञान ओझा (Pragyan Ojha) यांच्याकडे मुख्य निवडकर्ता (अध्यक्ष) पदाची धुरा सोपवली आहे. तर ओझा यांच्या रिक्त जागी मुंबईचे माजी कसोटीपटू आणि अनुभवी गोलंदाज रमेश पोवार यांचा निवड समितीचे नवीन सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने (CAC) सोमवारी याबाबतची अधिकृत घोषणा केली. समितीचे सदस्य अशोक मल्होत्रा आणि जतीन परांजपे यांनी निवड समितीच्या सदस्याची नियुक्ती प्रक्रिया राबवली. बीसीसीआय मुख्यालयात पार पडलेल्या मुलाखती आणि छाननीदरम्यान वसीम जाफर, रमेश पोवार, कॉनर विल्यम्स आणि जेकब मार्टिन यांसारख्या दिग्गज माजी खेळाडूंनी मुख्य निवडकर्त्यासाठी अर्ज केले होते. मात्र, सल्लागार समितीने एकमताने रमेश पोवार (Ramesh Powar) यांच्या नावावर सदस्यासाठी शिक्कामोर्तब केले.
फिरकीचा जादूगार ते बीसीसीआयचा मुख्य निवडकर्ता
भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष (मुख्य निवडकर्ता) म्हणून नुकतीच धुरा सांभाळणारे माजी डावखुरे फिरकीपटू प्रज्ञान ओझा यांची क्रिकेट कारकीर्द अत्यंत रंजक आणि चढ-उतारांनी भरलेली राहिली आहे. त्यांनी २००८ ते २०१३ या कालावधीत भारतासाठी तिन्ही प्रकारच्या फॉरमॅटमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. ओझाने २४ कसोटी सामने खेळले असून, ११३ बळी घेतले आहेत. यामध्ये एका सामन्यात सर्वोत्तम कामगिरी ८९ धावांत १० बळी इतकी आहे. तर पाच बळी सात वेळा घेतला आहेत.
तसेच १८ एकदिवसीय सामने खेळले असून, यात २१ बळी घेतले आहेत. तर सहा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत १० बळी आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १०८ सामन्यांत ४२४ गडी बाद केले आहेत. दरम्यान फेब्रुवारी २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर ओझा यांनी प्रशासकीय व समालोचकाच्या भूमिकेत काम केले. इंडियन क्रिकेटर्स असोसिएशन (ICA) चे प्रतिनिधी म्हणून त्यांनी बीसीसीआयच्या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलमध्येही कार्य केले आहे.
रमेश पोवार यांचा क्रिकेट प्रवास व अनुभव
मुंबईचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर रमेश पोवार यांनी भारताचे प्रतिनिधित्व करताना २ कसोटी आणि ३१ एकदिवसीय (ODI) सामने खेळले आहेत. खेळाडू म्हणून निवृत्तीनंतर त्यांनी प्रशिक्षक म्हणूनही मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक पद भूषवले असून, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भारतीय महिला संघाने आशिया कप जिंकला होता. तसेच, त्यांनी मुंबई आणि गुजरात संघाचे प्रशिक्षक म्हणून तसेच बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स येथे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही उत्कृष्ट सेवा दिली आहे.
अजित आगरकर यांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर नवी जबाबदारी
माजी अध्यक्ष अजित आगरकर यांनी जुलै २०२३ पासून मुख्य निवडकर्ता म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या नेतृत्त्वाखालील काळात भारतीय संघाने आयसीसीच्या तीन महत्त्वाच्या स्पर्धा, दोन आशिया कप आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदके अशी चमकदार कामगिरी केली. आता आगरकरांच्या जागेवर प्रज्ञान ओझा यांच्याकडे ही महत्त्वाची धुरा आली आहे. प्रज्ञान ओझाने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटच्या, म्हणजेच सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीच्या कसोटी सामन्यात (वानखेडे, नोव्हेंबर २०१३) वेस्ट इंडिजविरुद्ध दोन्ही डावात मिळून १० बळी टिपत ‘सामनावीर’चा मान मिळवला होता. आता हाच माजी फिरकी गोलंदाज भारतीय संघाचा मुख्य निवडकर्ता म्हणून काम पाहणार आहे.
नवीन निवड समितीमध्ये कुणाचा समावेश?
प्रज्ञान ओझा यांच्या अध्यक्षतेखाली आता नवीन राष्ट्रीय पुरुष निवड समिती काम पाहणार असून, यामध्ये खालील सदस्यांचा समावेश आहे. यात मुख्य निवडकर्ता प्रज्ञान ओझा (अध्यक्ष)
शिव सुंदर दास, आरपी सिंग, अजय रात्रा, रमेश पोवार (नवीन सदस्य)



