
चेन्नई | Chennai
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरू असलेल्या दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात एक नाट्यमय घडामोड पाहायला मिळाली. ईस्ट झोनचा १५ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि साऊथ झोनचा कर्णधार तिलक वर्मा (Vaibhav Suryavanshi and Tilak Varma) यांच्यात मैदानावर शाब्दिक चकमक झाली. सुरुवातीला मस्करी आणि स्लेजिंग म्हणून सुरू झालेल्या या संवादाने नंतर काही काळ तणावाचे रूप घेतले होते.
मैदानावर काय घडले?
साऊथ झोनचा कर्णधार तिलक वर्मा १५ वर्षीय वैभवला त्याच्या ‘उपकर्णधार’ पदावरून सातत्याने टोमणे मारत त्याचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी संवादादरम्यान तिलक वर्मा वैतागून वैभवच्या दिशेने पुढे गेला आणि मुक्का मारण्याचा इशारा केला. वैभवनेही मागे न हटता त्याचा खंबीरपणे सामना केला. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून अंपायर्सनी तातडीने मध्यस्थी करत दोन्ही खेळाडूंना (Players) एकमेकांपासून दूर केले.
वैभव सूर्यवंशीची आक्रमक खेळी
दरम्यान या वादाच्या घटनेपूर्वी वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीने छाप पाडली. त्याने सलामीवीर अभिमन्यू ईश्वरनसोबत पहिल्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली. वैभवने ३७ चेंडूंत ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४४ धावांची आक्रमक खेळी केली. एका शॉर्ट-पिच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅटच्या कडेला लागून हवेत गेला आणि तनय त्यागराजनने त्याचा झेल घेतला.
अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० मालिका
उपांत्य फेरीत ९२ व ४० धावा आणि अंतिम सामन्यात ४४ धावांची धडाकेबाज खेळी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीचे लक्ष आता भारतीय संघासोबतच्या (Team India) पुढील मालिकेवर आहे. भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील ३ सामन्यांची टी-२० मालिका १३ सप्टेंबरपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुरू होणार असून, वैभव या मालिकेत खेळताना दिसण्याची शक्यता आहे.




