नवी दिल्ली | New Delhi
फिफा वर्ल्ड कप २०२६ (FIFA World Cup 2026) चा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, दुसऱ्या हाय-व्होल्टेज सेमीफायनल सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनाने इंग्लंडचा २-१ असा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. या रोमहर्षक विजयानंतर आता अर्जेंटिनाचा सामना फायनलमध्ये बलाढ्य स्पेनविरुद्ध (Argentina and Spain) होणार आहे. फ्रान्सला पराभवाचा धक्का देत स्पेनने आधीच फायनलचे तिकीट पक्के केले होते. त्यामुळे आता रविवारी (दि.१९) रोजी होणाऱ्या या महामुकाबल्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे.
शेवटच्या ८ मिनिटांत मेस्सीने पलटवला गेम
इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात अर्जेंटिनाचा पराभव स्पष्ट दिसत होता. सामना संपायला अवघी ६ मिनिटे शिल्लक असताना इंग्लंडकडे (England) १-० अशी आघाडी होती. मात्र, शेवटच्या ८ मिनिटांत लिओनेल मेस्सीने आपल्या जादूई खेळाने संपूर्ण सामना पलटवला. अर्जेंटिनाने जोरदार कमबॅक केले आणि ‘इंज्युरी टाईम’मध्ये (Injury Time) लॉटारो मार्टिनेझने एक अफलातून गोल करत अर्जेंटिनाचा फायनलचा रस्ता पक्का केला.
पाच वर्षांपूर्वीच झाली होती फायनलची भविष्यवाणी?
या ऐतिहासिक विजयानंतर सोशल मीडियावर एका ट्विटची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हे ट्विट पाहून क्रीडाप्रेमीही थक्क झाले आहेत. २०२१ मध्ये, म्हणजेच तब्बल ५ वर्षांपूर्वी ‘डायलेमा’ (dilemma) नावाच्या एका ट्विटर (X) अकाऊंटवरून फिफा वर्ल्ड कप २०२६ बाबत एक भविष्यवाणी करण्यात आली होती. यात फिफा वर्ल्ड कप २०२६ च्या फायनल सामन्यात अर्जेंटिना संघ स्पेनचा ३-२ असा पराभव करेल आणि विश्वविजेता बनेल, असे म्हटले होते.

भविष्यवाणी खरी ठरणार का? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
विशेष म्हणजे ५ वर्षांपूर्वी केलेल्या या भविष्यवाणीनुसार, अर्जेंटिना आणि स्पेन हे दोन्ही संघ खरोखरच २०२६ च्या फायनलमध्ये आमनेसामने आले आहेत. त्यामुळे आता या ट्विटचा अर्धा भाग खरा ठरला आहे. आता रविवारी होणाऱ्या महाअंतिम सामन्यात अर्जेंटिना स्पेनला ३-२ ने हरवून पुन्हा एकदा विश्वचषक उंचावणार का? आणि ही भविष्यवाणी १०० टक्के खरी ठरणार का? याकडे आता जगभरातील फुटबॉल चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.
सामना कोठे होणार?
२०२६ फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना गतविजेता अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात रविवारी (दि.१९) रोजी अमेरिकेतील न्यू यॉर्क-न्यू जर्सी स्टेडियमवर (मेटलाइफ स्टेडियम) होणार आहे. हा ऐतिहासिक सामना भारतीय वेळेनुसार (IST) सोमवारी (दि.२० जुलै) रोजी मध्यरात्री १२:३० वाजता सुरू होईल. या अंतिम सामन्याची सर्वात मोठी आकर्षक बाजू म्हणजे लिओनेल मेस्सी विरुद्ध लॅमिन यामाल असणार आहेत. एका बाजूला दिग्गज मेस्सी अर्जेंटिनाला सलग दुसरे जेतेपद मिळवून देण्यासाठी सज्ज आहे. तर दुसऱ्या बाजूला १९ वर्षांचा युवा स्टार यमाल स्पेनला दुसरे विश्वविजेतेपद मिळवून देण्यासाठी मैदानात उतरेल.




