मुंबई | Mumbai
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (रविवारी) दोन सामने खेळविण्यात येणार आहेत. यातील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स (KKR vs RR) यांच्यात होणार आहे. तर दुसरा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळविण्यात येणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाचे कर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे आहे. तर राजस्थान रॉयल्स संघाचा नियमित कर्णधार संजू सॅमसन अद्याप दुखापतीतून पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. त्यामुळे संघाचे कर्णधारपद रियान परागकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने गुवाहाटी (Guwahati) येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरूध्द ८ गडी राखून विजय संपादन केला होता. आता राजस्थान रॉयल्स विरूध्द सलग दुसऱ्यांदा मात करण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स मैदानावर उतरणार आहे. आयपीएलमध्ये या दोन्ही संघांत ३१ सामने खेळविण्यात आले असून, हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास कोलकाता नाईट रायडर्सने १५ तर राजस्थान रॉयल्सने १४ सामन्यात विजय संपादन केला आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर ११ सामने खेळविण्यात आले असून, कोलकाता नाईट रायडर्सने ६ तर राजस्थान रॉयल्सने ४ सामन्यात विजय संपादन केला आहे. दोन्ही संघांमध्ये खेळविण्यात आलेल्या अखेरच्या ५ सामन्यांच्या निकालावर (Result) नजर टाकल्यास राजस्थान रॉयल्सने ३ तर कोलकाता नाईट रायडर्स ने १ विजय संपादन केला आहे. तसेच १ सामना रद्द करण्यात आला आहे.
दुसरीकडे सायंकाळी लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज (LSG vs PBKS) यांच्यात लढत होणार आहे. लखनौचे कर्णधारपद यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतकडे तर पंजाबचे श्रेयस अय्यरकडे आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत आपले आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघांसाठी ही लढत अतिशय महत्वाची असणार आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाच्या खात्यात १० सामन्यात ५ विजय आणि ५ पराभवांसह १० गुण जमा असून, गुणतालिकेत लखनौ सुपर जायंट्स सहाव्या स्थानावर आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाला मुंबई इंडियन्स विरूध्द खेळविण्यात आलेल्या अखेरच्या सामन्यात (Match) ५४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे विजयी मार्गावर परतण्यासाठी लखनौ सुपर जायंट्स सज्ज असणार आहे.
तर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळताना पंजाब किंग्जने यंदाच्या हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. पंजाब किंग्जने १० सामन्यात ६ विजय ३ पराभव आणि १ अतिरिक्त गुणासह १३ गुणांची (Point) कमाई केली आहे. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्स संघाला पराभूत करून बाद फेरीच्या दिशेने कुच करण्यासाठी पंजाब किंग्ज सज्ज असणार आहे. विशेष म्हणजे आयपीएल (IPL) स्पर्धेमध्ये दोन्ही संघांत ५ सामने खेळविण्यात आले असून, हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास लखनौ सुपर जायंट्सने ३ आणि पंजाब किंग्जने २ सामन्यात विजय संपादन केला आहे.