मुंबई | Mumbai
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (रविवारी) दोन सामने खेळविण्यात येणार आहेत. यातील पहिला सामना दुपारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि पंजाब किंग्जमध्ये (RCB vs PBKS) होणार आहे. तर दुसरा सामना चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI) यांच्यात सायंकाळी ७:३० वाजता खेळविण्यात येणार आहे.
पंजाब किंग्जने श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वाखाली खेळताना यंदाच्या मोसमात चमकदार कामगिरी केली आहे. पंजाब किंग्जने ६ सामने खेळले असून,५ सामन्यात विजय संपादन केला आहे. दुसरीकडे बंगळूरु संघाने यंदाच्या हंगामात रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळताना ७ सामन्यात ४ विजय आणि ३ पराभवांसह ८ गुणांची कमाई केली आहे. उपांत्य फेरीच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी ही लढत अतिशय महत्वाची असणार आहे.
तर दुसरा सामना चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. आयपीएलच्या स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीच्या शर्यतीत आपले आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघांसाठी विजय अनिवार्य असणार आहे. दोन्ही संघ यंदाच्या हंगामात सलग दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. चेन्नई येथील एम ए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या पहिल्या साखळी फेरीच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने मुंबई इंडियन्स विरूध्द ४ गडी राखून विजय संपादन केला होता. या पराभवाची परतफेड करण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज असणार आहे.
दरम्यान, आयपीएल (IPL) क्रिकेट स्पर्धेमध्ये दोन्ही संघांमध्ये ३९ सामने खेळविण्यात आले असून, हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास मुंबई इंडियन्सने कायमच चेन्नई सुपरकिंग्ज विरूध्द आपला दबदबा निर्माण केला आहे. मुंबई इंडियन्सने २१ तर चेन्नई सुपरकिंग्जने १८ सामन्यात विजय संपादन केला आहे. विशेष म्हणजे वानखेडे स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या १३ पैकी ७ सामन्यात मुंबईने तर ६ सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने विजय संपादन केला आहे.