मुंबई | Mumbai
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (रविवारी) दोन सामने होणार आहेत. यातील पहिला सामना दुपारी ३.३० वाजता दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad ) तर दुसरा सामना सांयकाळी ७.३० वाजता चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स ( Chennai Super Kings vs Rajasthan Royals) यांच्यात खेळविण्यात येणार आहे. त्यामुळे या सामन्यांत कोणता संघ विजय मिळवतो हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.
सनरायझर्स हैदराबाद संघाचे कर्णधारपद पॅट कमिन्सकडे (Pat Cummins) असणार आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघाची धुरा अक्षर पटेल कडे असणार आहे. विशाखापट्टणम येथे लखनौ सुपर जायंट्स संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने १ गडी राखून थरारक विजय संपादन केला होता. त्यानंतर आता सनरायझर्स हैदराबाद संघाला पराभूत करून सलग दुसरा विजय संपादन करण्याची संधी दिल्ली कॅपिटल्सकडे असणार आहे.
दुसरीकडे सनरायझर्स हैदराबाद संघाने सलामीच्या लढतीत राजस्थान रॉयल्स विरूध्द ४४ धावांनी विजय संपादन करून विजयी सलामी दिली होती. मात्र, लखनौ सुपर जायंट्स संघाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला ५ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे हा पराभव विसरून नव्या उमेदीने विजयी मार्गावर परतण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद संघाचा प्रयत्न असणार आहे.
तर दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. राजस्थान रॉयल्सने २ सामने खेळले असून, त्यांना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद विरूध्द पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे चेन्नई सुपरकिंग्ज संघाला पराभूत करून आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये विजयी सलामी देण्यासाठी राजस्थान रॉयल्स उत्सुक असणार आहे. तर चेन्नईने पहिल्या सामन्यात मुंबईवर विजय मिळविला आहे.
दरम्यान, दोन्ही संघांमध्ये खेळविण्यात आलेल्या अखेरच्या ५ सामन्यांच्या निकालावर (Result) नजर टाकल्यास राजस्थान रॉयल्सने ४ सामन्यात विजय संपादन केला आहे. तर चेन्नई सुपरकिंग्ज संघाला केवळ एक विजय संपादन करता आला आहे.