अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तर दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू आहेत. यंदा पहिल्यांदाच बोर्डाने दहावी- बारावीच्या लेखी परीक्षांप्रमाणे प्रात्यक्षिक परीक्षा पारदर्शक व्हावी, यासाठी भरारी पथके नेमण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या भरारी पथकाला शाळांमधील लॅब, प्रयोगशाळेचे फोटो, जर्नल, विद्यार्थी प्रयोग करतानाचे फोटो बोर्डाला पाठवावे लागणार आहेत.
नगर जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 116 तर दहावीच्या विद्यार्थ्यांची 189 परीक्षा केंद्रे असणार आहेत. प्रत्येक केंद्राला पक्के वॉल कंपाऊंड आहे. तेथील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत आणि परीक्षेवेळी शाळा परिसरात ड्रोन वापरला जाणार आहे. लेखी परीक्षेवेळी पर्यवेक्षकांमध्येही सरमिसळ (आपल्या शाळेचे विद्यार्थी ज्या केंद्रांवर नाहीत तेथे पर्यवेक्षक) असणार आहे. तत्पूर्वी होणार्या प्रात्यक्षिक तथा तोंडी परीक्षेतही बोर्डाने लक्ष घातले आहे. प्रत्येक शाळांवर जाणार्या बहिस्थ: परीक्षकांची नावे बोर्डाकडूनच अंतिम केली जाणार आहेत. प्रात्यक्षिक परीक्षेवेळी अचानक भेटी देणार्या भरारी पथकात गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी, उपशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी असणार आहेत.
इयत्ता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा पारदर्शक होण्यासाठी बोर्डाने काही बदल केले आहेत. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी आता अनुदानित शाळांवरील शिक्षक बहिस्थ: परीक्षक म्हणून खासगी स्वयंअर्थसहाय्यिता शाळांवर जातील. स्वयंअर्थसहाय्यिता शाळांवरील शिक्षक खासगी अनुदानित शाळांमधील प्रात्यक्षिक परीक्षा घेतील. लेखी परीक्षेत प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा असेल. तेथील पर्यवेक्षकाचे मोबाईल झूमद्वारे जोडले जातील. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या संनियंत्रण कक्षातून वरिष्ठ अधिकारी परीक्षेवर लक्ष ठेवतील.
लॅब, प्रयोगशाळेचे फोटो पाठवावे लागणार
प्रात्यक्षिक परीक्षेवेळी शाळांना भेटी देणार्या भरारी पथकाने नेमकी काय माहिती पडताळायची, याचा नमुना बोर्डाने संबंधितांना दिला आहे. त्या शाळेत अद्ययावत लॅब आहे का, प्रयोगशाळेत प्रयोग होतात का, विद्यार्थ्यांनी जर्नल व्यवस्थित पूर्ण केली आहेत का, अशा बाबी भरारी पथकातील अधिकार्यांनी तपासायच्या आहेत. त्यानंतर त्याचे जीओ टॅग फोटो बोर्डाला पाठवायचे असल्याचे परीक्षा परिषदेकडून सांगण्यात आले आहे.
विभागीय अध्यक्षांनी घेतल्या दोन बैठका
पुणे बोर्डाचे विभागीय अध्यक्ष औदुंबर उकीरडे यांनी मागील आठवड्यात उत्तर नगर जिल्ह्यातील दहावी आणि बारावीच्या शाळांचे मुख्याध्यापक व प्राचार्य यांची लोणी येथे तर दोन दिवसांपूर्वी नगरमध्ये दक्षिणेतील शाळांचे मुख्याध्यापक व प्राचार्य यांची बैठक घेतली. या बैठकीला मुख्याध्यपक व प्राचार्य यांनी स्वत: हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, यावेळी अनेकांनी आपले प्रतिनिधी या बैठकीला पाठवले होते.
प्रात्याक्षिक परीक्षेचे गुण ऑनलाईन भरा
विभागीय अध्यक्ष उकीरडे यांनी यंदापासून दहावी आणि बारावीच्या प्रात्याक्षिक परीक्षा या पारदर्शकपणे व्हाव्यात, यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे. यंदापासून प्रात्याक्षिक परीक्षेसाठी संबंधीत शाळांमधील लॅब (प्रयोगशाळा) कशी असावी, याबाबत पुण्यावरून ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात आले आहे. यानूसार यंदाच्या प्रात्याक्षिक परीक्षामध्ये लॅब सज्ज ठेवण्यास सांगण्यात आले आहे.




