अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
प्रवासी वाहतूक सुरळीत पार पडावी यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे नियमावली आखून दिली गेली आहे. मात्र, या नियमांचे उल्लंघन करत एक धक्कादायक प्रकार अहिल्यानगर शहरात समोर आला आहे. एस. टी. महामंडळाच्या अहिल्यानगर ते भिंवडी या बसवरील चालक आणि वाहक यांनी ड्युटीवर असताना मद्यप्राशन केले आणि प्रवासी भरलेल्या बससह मार्गस्थ झाले. ही गंभीर बाब प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी नेप्ती (ता. अहिल्यानगर) शिवारात बस थांबवून ऑनलाईन टोल फ्री क्रमांकावर तक्रार केली. त्यानंतर हा प्रकार चव्हाट्यावर आला.
या प्रकरणी तारकपुर आगारातील वाहतूक नियंत्रक भिमराज रामभाऊ ढगे (वय 52 रा. वाळकी, ता. अहिल्यानगर) यांनी शनिवारी (14 जून) रात्री दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक किरण गोविंद केकान व वाहक सोमेश्वर जगन्नाथ रोडे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना 12 जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली. ढगे यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी 12 जून रोजी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास तारकपूर स्थानकावरून भिंवंडीकडे रवाना झालेल्या एमएच-20 बीएल-3138 क्रमांकाच्या बसची नोंद घेतली होती. संबंधित बसवर चालक किरण केकान आणि वाहक सोमेश्वर रोडे हे नेमण्यात आले होते.
मात्र, रात्री सुमारे 10.15 वाजताच्या दरम्यान वरिष्ठ अधिकार्यांकडून कळविण्यात आले की, टोल फ्री क्रमांकावर प्रवाशांनी फोन करून तक्रार केली आहे की संबंधित बसचे चालक व वाहक हे दारूच्या नशेत आहेत आणि प्रवाशांनी नेप्ती गावाजवळ बस थांबवून ठेवली आहे. ढगे यांनी वर्कशॉपचे कर्मचारी सय्यद मुज्जामीन यांना घेऊन नेप्ती गावाजवळ धाव घेतली असता, बस रस्त्याच्या कडेला थांबवलेली दिसून आली आणि चालक व वाहक हे दारूच्या नशेत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर प्रवाशांना दुसर्या बसमधून पुढील प्रवासासाठी व्यवस्था करण्यात आली. पुढे या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी ढगे यांनी दोघांची वैद्यकीय तपासणी केली. तपासणी अहवालात चालक व वाहक यांनी दारूचे सेवन केल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




