Wednesday, December 4, 2024
Homeनगरएसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे आठ आगारातील वाहतूक बंद

एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे आठ आगारातील वाहतूक बंद

1207 बसफेर्‍या रद्द || प्रवाशांची गैरसोय

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपात नगर जिल्ह्यातील 50 टक्के कर्मचारी सहभागी झालेले आहेत. एकूण 11 पैकी 8 आगारातील वाहतूक सेवा बंद पडली आहे. परिणामी प्रवाशांची मोठीच गैरसोय निर्माण झाली आहे. खासगी प्रवासी वाहतूकदारांनी याचा गैरफायदा उचलण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान नगर विभाग नियंत्रक कार्यालयातील कर्मचार्‍यांनी काल, बुधवारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. कामगार संयुक्त कृती समितीच्या पदाधिकार्‍यांची बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा होणार असल्याने कर्मचारी व नागरिकांनाही त्यातील निर्णयाची प्रतीक्षा होती. सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे सुविधा मिळाव्यात, सातवा वेतन आयोग लागू करावा, मागील वेतन वाढीचा फरक मिळावा आधी विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, कामगार सेना, कास्ट्राइब व इंटक या संघटनांनी संप पुकारला आहे.

- Advertisement -

नगर जिल्ह्यात एसटी महामंडळाकडे प्रशासकीय, कार्यशाळेतील तांत्रिक, चालक, वाहक असे 3 हजार 573 कर्मचारी आहेत. त्यातील 1 हजार 916 कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामध्ये प्रशासकीय 150, कार्यशाळेतील 211 चालक 806 व वाहक 749 जणांचा समावेश असल्याची माहिती प्रभारी विभागीय नियंत्रक अविनाश साखरे यांनी दिली. जिल्ह्यात महामंडळाचे 11 आगार आहेत. त्यातील 8 आगारातील बस सेवा प्रभावीत झाली आहे तर जामखेड, संगमनेर व तारकपूर येथून बससेवा सुरू होत्या. काल सायंकाळी 4 पर्यंत 1 हजार 516 बस फेर्‍यांपैकी 1 हजार 207 बसफेर्‍या रद्द झाल्या. केवळ 309 फेर्‍या झाल्या. जिल्ह्यात बहुतेक बस स्थानकांवर शुकशुकाट जाणवत होता.

मात्र बसस्थानकाचे आवार खाजगी प्रवासी वाहतूकदारांनी वेढून गेले होते. महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी मंगळवारी सकाळपासून संप सुरू केला आहे. काल संपाचा दुसरा दिवस होता. संप त्वरित मिटावा अशी प्रवाशांची अपेक्षा आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने प्रवाशांना अधिकच गैरसोय सहन करावी लागत आहे. जिल्ह्यात 634 एसटी बस आहेत. गौरी गणपतीच्या काळात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नगर जिल्ह्यातील बस कोकणात पाठवल्या जातात. यंदाही 280 बस रवाना केल्या जाणार आहेत. त्याची सुरुवात आज सायंकाळपासून झाली. नाशिक विभागातून सुमारे 1 हजार बस कोकणात पाठवल्या जाणार आहेत. संप काळात बसफेर्‍या रद्द होत असतानाच जिल्ह्यातील बस बाहेर पाठवल्या जात आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या