मुंबई | प्रतिनिधी Mumbai
एसटी महामंडळाच्या सर्व बसेस पर्यावरणपूरक इंधनावर परावर्तीत करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या सर्व बसेस टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक आणि एलएनजी इंधनावर सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानपरिषदेत दिली.
भाजपच्या आमदार उमा खापरे यांनी पिंपरी चिंचवड आणि हिंजवडी येथील आरएमसी प्लांटमुळे धूळ आणि प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत अमित गोरखे यांनी सहभाग घेत प्रदूषण कमी करण्यासाठी एसटी महामंडळाच्या सर्व गाड्या ईलेक्ट्रिक करणार काय, अशी विचारणा केली.
त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, एसटी महामंडळासाठी ५ हजार १५० इलेक्ट्रिक बसेसची खरेदी करण्यात येणार आहे. यापैकी ४५० बसेस आल्या आहेत. तसेच एसटीच्या सध्याच्या बसेस एलएनजीमध्ये परावर्तीत करण्यात येणार असून एलएनजी पुरवठा करण्यासाठी कतारच्या कंपनीशी करार करण्यात आला आहे. ही कंपनी १० वर्षासाठी एलएनजीचा पुरवठा करणार असून डिझेलवर धावणाऱ्या गाड्याही टप्प्याटप्प्याने एलएनजीवर परावर्तीत होतील.