अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पुण्यात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यामुळे एसटी महामंडळाच्या कार्यपध्दतीसोबत सुरक्षेबाबत पुनर्विचार करण्याची गरज आहे. एसटीसह सार्वजनिक वाहतूक करणार्या कॅब यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी परिवहन सचिवांसोबत संबंधीत जिल्ह्यातील आरटीओची आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांची विभाजनाची मागणी प्रलंबित आहे. हा केवळ अहिल्यानगरचा विषय नाही. विभाजनाचा निर्णय शासन स्तरावर होणार आहे. त्यामुळे त्याला कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी (दि. 27) आयोजित प्रशासनाच्या बैठकीआधी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांना विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे जिल्हा विभाजनाच्या मागणीवर ठाम आहेत याबाबत विचारले असता, पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, राज्यात अनेक जिल्ह्यांची विभाजनाची मागणी प्रलंबित आहे. हा केवळ अहिल्यानगरचा विषय नाही. विभाजनाचा निर्णय शासन स्तरावर होणार असेल तर त्याला कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. दरम्यान, यापूर्वी जिल्हा विभाजनावरून विखे व राम शिंदे यांच्यात कायमच विरोधाभास राहिलेला आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे. पुण्यातील घटनेवर बोलतांना विखे पाटील यांनी एसटी महामंडळाच्या कार्यपध्दती व सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच ते परिवहन मंत्री असतांना एसटीसह पुण्यातील कॅब चालकांसाठी काही कडक नियम केले असल्याचे सांगितले. कॅब चालक आणि संबंधीत कंपन्या यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही परिवहन विभागाची असून संबंधीत जिल्ह्याचे आरटीओ यांनी याबाबत पुढाकार घेवून कारवाई करायला हवी. त्यानंतर पोलिस खाते त्यांची कारवाई करतील, असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
मढीचा निर्णय ग्रामस्थ, प्रशासनाने समन्वयाने घ्यावा
मढी यात्रेत मुस्लीम बांधवांना दुकाने लावण्यास विरोध करणारा ठराव ग्रामपंचायतीने केल्यावरून तणाव निर्माण झाल्याबाबत विचारले असता, विखे पाटील म्हणाले, मढी यात्रेची अनेक वर्षांची परंपरा आहे. लोकभावनेचा आदर लक्षात घेता ग्रामस्थ व प्रशासनाने समन्वय ठेवून एकत्र निर्णय घ्यावा. फक्त काही नवीन प्रथा पडू नये, याची काळजी घ्यावी.
जयंत पाटील योग्य निर्णय घेतील
शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत वावड्या उठल्या असून विखे यांच्याशी त्यांची भेट झाल्याबाबत पत्रकारांनी छेडले असता, केवळ भेटीवरून राजकीय गणितांची शंका कोणी घेऊ नये. दोन दिवसांपूर्वी भेट झाली होती. जयंत पाटील सक्षम नेते आहेत. ते स्वत:चा निर्णय घेऊ शकतात. त्यानुसार चांगला निर्णय ते घेतील, अशी अपेक्षा आहे, असे सूचक विधान विखे यांनी केले.
डेपो मॅनेजर गुन्हा दाखल करा
पुण्यातील अत्याचारा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवणे व सरकार पक्षातर्फे वरिष्ठ वकील देऊन आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्याच्यादृष्टीने प्रयत्न करणार आहोत. याप्रकरणात एसटी प्रशासनाची बेपर्वाई पुढे आली आहे. राज्यातील बहुतांश डेपोमध्ये बंद पडलेल्या गाड्या उभ्या आहेत. त्या गाड्या निकाली काढण्याच्यादृष्टीने एसटी महामंडळाने काम केले पाहिजे. पुण्याच्या त्या घटनेच्या संदर्भात बेपर्वाई दाखवल्याने तेथील डेपो इन्चार्ज वरही गुन्हा दाखल केला पाहिजे. बस स्थानकांतून सीसीटीव्ही बसवणे व त्यांची लिंकजवळच्या पोलीस ठाण्यांना देण्याचे सांगितले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.