मुंबई | Mumbai
स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने (Kunal Kamra) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर विडंबनात्मक गाणं रचून ते शोमध्ये सादर केल्याने नवा वाद उफाळला आहे. या गीताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान झाल्याचा दावा करत शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खार येथील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील हॅबिटॅट स्टुडिओची नासधूस केली. त्यानंतर आता कुणाल कामराने इंस्टाग्रामवर आणखी एक व्हिडीओ शेअर करत शिवसेनेवर टीका केली आहे.
कुणाल कामराने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर (Instagram Account) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ‘हम होंगे कंगाल एक दिन, मन में है अंधविश्वास, देश का सत्यानाश. होंने नगे चारों ओर, करेंगे दंगे चारों ओर पुलिस के पंगे चारों ओर. एक दिन मन में नथूराम, हरकतें आसाराम. ‘हम होंगे कंगल एक दिन’ या गाण्यासोबत शिवसेनेच्या (Shivsena) कार्यकर्त्यांनी द हॅबिटॅटची कशी तोडफोड केली, हे दाखवले आहे. विकसित भारताचे नवीन राष्ट्रगीत असे म्हणत कामराने हा व्हिडिओ बनवलेला आहे.
दरम्यान, कुणाल कामराच्या या नव्या गाण्यावर (Song) प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. कुणाल कामराने आधी गाणं गायलं, मग शिवसैनिकांनी तोडफोड करत त्या गाण्यासाठी व्हिडीओ (Video) फुटेज उपलब्ध करुन दिला, अशा तिरकस, खोचक प्रतिक्रिया काहींनी मांडल्या आहेत. तसेच आता यावर शिवसेना (शिंदे गट) काय प्रतिक्रिया देते, हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.