काळ नोकरी सांभाळून संगीतसेवा केली. त्यांनी नाटके बसवली, नवीन कलाकारांना नाट्यसंगीत कसे गावे याचे धडे दिले. मी ‘सर्वात्मका’ गायचो तेव्हा ते म्हणायचे, ‘तू हे गातोस पण ते ‘क्लासिकल सर्वात्मका’ आहे. स्टेजवरचे ‘सर्वात्मका’ वेगळे आहे. स्टेजवर बाजूला दुसरे पात्र असताना तेच गाणे, आवाजाचे मॉड्युलेशन वेगळे होते. सांगितलेल्या या बारकाव्यातूनच त्यांचा गाण्याचा अभ्यास समजू शकेल.
रामदास कामत यांच्या निधनाची बातमी चटका लावून जाणारी ठरली. अत्यंत भरीव कारकीर्द घडवणारा हा माणूस अनेक अवीट गाण्यांच्या रूपाने काळावर आपला ठसा उमटवून गेला. त्यांच्या जाण्याने प्रत्येक मराठी मन हळहळत असेल यात शंका नाही. मी अभिषेकीबुवांकडे शिकायला आलो तेव्हा या क्षेत्रात अगदीच नवीन होतो. माझ्यासाठी मुंबई ही मायानगरी पूर्णपणे अनोळखी होती. त्यावेळी शिवाजी मंदिरला ‘मानापमान’चा प्रयोग लागला होता. शिवाजी मंदिर अभिषेकीबुवांच्या निवासस्थानापासून जवळच होते. एके दिवस सकाळी बुवा मला म्हणाले, ‘जा आणि ‘मानापमान’ बघून ये. त्यातले रामदास कामत नावाचे गायक इतके छान गातात की त्यांना ऐकूनही तुला बरेच काही शिकायला मिळेल. ते सूर कसा लावतात, रंगभूमीवर सूर किती खडा लावावा लागतो, स्टेजवर कसे गायचे असते हे तुला त्यांना ऐकल्यानंतर समजेल.’ बुवांनी सांगितल्यानुसार मी चालतच शिवाजी मंदिरला गेलो. ‘तिकीट काढू नकोस, माझे नाव सांग’ असे बुवांनी सांगून ठेवले असल्यामुळे त्यांचे नाव सांगताच डोअरकिपरने मला आत सोडले. मी सर्वात मागच्या रांगेतल्या खुर्चीवर बसलो. प्रयोग सुरू झाल्यानंतर रामदासजींनी ‘माता दिसली…’ म्हणायला सुरुवात केली आणि त्या ‘माता…’लाच असा काही सूर लावला की रसिकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. पुढचे गाणे अद्याप सुरूही झाले नव्हते पण पुढची काही मिनिटे कडकडाट सुरूच होता. त्या एक-दोन मिनिटांमध्येच मला स्टेजवरचा खडा सूर काय असतो हे समजले. त्या दिवशी ते नाटकातील सगळी गाणी एकामागोमाग एक असे काही गायले की उपस्थित सगळेच तृप्त झाले. तो विलक्षण आनंद घेऊनच मी परतलो.
पुढे पुढे ऐकत गेलो तसे त्यांचे गाणे मला विलक्षण आवडू लागले. नंतर आमच्या भेटीगाठी होऊ लागल्या, ओळख वाढू लागली. कधी ते मला फोन करायचे तर कधी मी त्यांना फोन करायचो. भेट झाली की ते मला अभिषेकीबुवांच्या आठवणी सांगायचे. तालमीच्या वेळी त्यांनी पटकन एखादी चाल कशी बदलली, चालीचा ताल अचानक कसा बदलला, ‘इथे झपताल नको तर रुपक ठेवूया’ अशा अनेक बाबी सांगितल्या. एखादी चाल कशी सुचली हे ते भरभरून सांगत असत. अभिषेकीबुवांबद्दल बोलताना मध्येच ते ‘तो काय माणूस होता…’ असे म्हणत तेव्हा त्यांच्या मनात बुवांबद्दल परकोटीचे कौतुक ओथंबलेले दिसत असे. मी हार्मोनियम घेऊन बसलो तरी कधी कधी तीन-तीन दिवस मला दोन ओळीही सूचत नाहीत, पण अभिषेकी यायचे आणि एखाद्याला ऑर्गनवर बसायला सांगून बघता बघता चाल लावून जायचे, अशा आठवणी सांगताना त्यांचा कंठ दाटून येत असे. खरे तर कलाकार स्वत:संबंधीच्या अशा गोष्टी सांगताना कचरतात. पण रामदासजी कलाकाराबरोबरच माणूस म्हणूनही खूप मोठे होते. त्यामुळेच दुसर्या कलाकाराविषयी भरभरून बोलताना त्यांनी कधीही मागेपुढे पाहिले नाही.
अभिषेकीबुवाच नव्हे; मी त्यांना कधीच कोणत्याही गायकाबद्दल, कलाकाराबद्दल आकसाने बोलताना बघितले नाही. उलटपक्षी ते प्रत्येकाप्रती इतक्या आत्मियतेने बोलायचे की त्या प्रत्येक शब्दातून त्यांच्या वृत्तीची निखळता आणि मनाचा मोठेपणा आरपार दिसायचा. त्यांना स्टेजवर ऐकणे ही तर मोठी पर्वणीच असायची. खरे सांगायचे तर ते रसायनच काही वेगळे होते. त्यांनी गायलेल्या गाण्यांना बुवांनी दिलेल्या चाली तर अप्रतिमच होत्या पण चालींना रामदासजींचा आवाज लाभल्यामुळे त्या अधिक चांगल्यारीतीने लोकांपर्यंत पोहोचल्या, असे मला वाटते. त्यांनी गायलेली सगळीच गाणी दीर्घकाळ स्मरणात राहणारी आहेत. गाण्यांना अन्य कोणाचा आवाज असता तर ती गाणी इतकी संस्मरणीय झाली असती की नाही, अशी शंका वाटते. ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’, ‘साद देती हिमशिखरे’, ‘प्रेम वरदान’ अशी अनेक आणि ‘मीरामधुरा’ नाटकातली सगळी गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. ‘मीरामधुरा’ हे नाटक फारसे गाजले नसले तरी त्यातली गाणी खूप गाजली. अभिषेकीबुवांनी रामदासजींबद्दल बोलताना एकदा मला सांगितले, ‘मी एखादी चाल लावली आणि ती कठीण वाटली तर बाकीचे गायक ती चाल थोडी सोपी करण्याबद्दल सांगतात. मी चालीत थोडाफार बदल करावा, असे त्यांना वाटत असते. पण रामदास कामत हा असा गायक आहे, जो मी सांगेल तसेच गाणे म्हणतो. गळ्यातून उतरत नाही तोपर्यंत ती चाल घोटत राहतोे. त्याने एकदाही मला एखादी चाल सोपी करून देण्याचा आग्रह केला नाही. एकदा त्याच्या गळ्यात चाल उतरली की तो असा काही गातो की ऐकणार्याने ऐकत राहावे…’ अभिषेकीबुवांचे हे शब्द आज मला प्रकर्षाने आठवत आहेत.
असा हा उत्तुंग क्षमतेचा गायक… पार्ल्याला त्यांची नेहमी भेट होत असे. अंगात अर्ध्या बाह्यांचा सदरा, पायजमा आणि हातात भाजीची एखादी पिशवी घेतलेले रामदासजी हनुमान रोडला अनेकदा भेटायचे. मार्केटमध्ये गेलो होतो, आता घरी निघालो… असे हसत हसत बोलायचे. खरे तर आजच्या पिढीने या दिग्गज व्यक्तिमत्त्वाच्या ठायी असलेला साधेपणा अंगीकारायला हवा. पर्वताइतकी उंची गाठणार्या या लोकांच्या वागण्या-बोलण्यात अत्यंत साधेपणा होता. तो त्यांनी शेवटपर्यंत जपला. रामदास कामत, भीमसेनजी, अभिषेकीबुवा, पं. वसंतराव देशपांडे, कुमारजी असे कोणाचेही रूप आठवा, यातल्या कोणी तरी कधी नक्षीचा कुर्ता घातल्याचे तरी दिसले का? ठराविक पांढरा अथवा क्रिम रंगाचा कुर्ता आणि पायजमा अशा साध्या वेशात दिसणार्या या लोकांनी गाठलेली उंची मात्र थक्क करून टाकणारी आहे. त्यांच्या वागण्या-बोलण्यात कधीच आपण कोणी थोर असल्याचा अभिनिवेश दिसला नाही. आता अशी एक निरलस पिढी मागे पडत असल्याचे खूप दु:ख होते.
रामदास कामत यांनी प्रदीर्घ काळ नोकरी सांभाळून ही संगीतसेवा केली. त्यांनी नाटके बसवली, नवीन कलाकारांना नाट्यसंगीत कसे गावे याचे धडे दिले. मी ‘सर्वात्मका’ गायचो तेव्हा ते म्हणायचे, ‘तू हे गातोस पण ते ‘क्लासिकल सर्वात्मका’ आहे. स्टेजवरचे ‘सर्वात्मका’ वेगळे आहे. बैठकीला बसल्यानंतर गायले जाणारे गाणे, त्याचे मॉड्युलेशन वेगळे होते तर स्टेजवर बाजूला दुसरे पात्र असताना तेच गाणे, आवाजाचे मॉड्युलेशन वेगळे होते. या बारकाव्यातूनच त्यांचा गाण्याचा प्रचंड अभ्यास कळावा. त्यांनी अनेक चांगले गायक घडवले. नव्या कलाकारांना घेऊन अरविंद पिळगावकर आणि रामदास कामत यांनी अनेक जुनी नाटके पुन्हा बसवली. आज रामदास कामत आपल्यात नाहीत. पण त्यांचा आवाज अजरामर आहे. पुढच्या अनेक पिढ्या त्यांची गाणी ऐकतील आणि त्यावर अभ्यास करतील. त्यांना विनम्र आदरांजली.
अजित कडकडे, प्रसिद्ध गायक
आता केवळ स्मृती उरल्या…
लहानपणापासून रामदासजींची गाणी कानावर पडली. त्यामुळे त्या कोवळ्या वयामध्ये ‘नाट्य क्षेत्रातले एक मोठे नाव’ अशी त्यांची छबी मनावर बिंबली. कोणालाही आपलीशी वाटावी आणि पटकन आवडावी अशी त्यांची गायकी होती. त्यांची शब्द उच्चारण्याची, ताना घेण्याची पद्धत या सगळ्यातच सहजता होती. रामदासजींचा स्वभावही अत्यंत पारदर्शी होता. कलाकाराबरोबरच माणूस म्हणूनही ते खूप मोठे होते. स्वभावातला प्रामाणिकपणा त्यांच्या गाण्यात स्पष्ट दिसायचा.अतिशय छान आणि सुस्पष्ट मांडणी हे त्यांच्या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. संगीत रंगभूमीवरचे त्यांचे योगदानही खूप मोठे आहे. त्यांनी नव्या-जुन्या संगीत नाटकांचे शेकडो प्रयोग केले. ते शेवटपर्यंत गायनसेवेत रममाण राहिले. त्यांनी उतारवयात गायलेले गाणे मी ऐकले आहे. पण त्या गाण्यातही त्यांनी तरुणवयात गायलेल्या गाण्यातली तडफ, उत्साह टिकून असल्याचे जाणवले होते. म्हणजेच वय पुढे गेले असले तरी त्यांच्या गाण्यातला तजेला मात्र कायम होता. याचे मर्म नक्कीच त्यांच्या अनेक वर्षांच्या गानसाधनेत दडले होते. अन्य कलाकारांचे मनमुराद कौतुक करणे हे रामदासजींचे स्वभाववैशिष्ट्य होते. रामदासजींची सगळीच गाणी संस्मरणीय आहेत. त्यातही ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’, ‘गुंतता हृदय हे’, ‘नको विसरू संकेत मिलनाचा’ ही गाणी मला विशेष आवडतात. एका वैयक्तिक समारंभात त्यांची आणि माझी मैफल आयोजित केली गेली होती. माझ्या दृष्टीने तो एक सुंदर योग होता. रामदासजींच्या अशा अनेक स्मृती कायम आपल्यासवे राहतील. त्यांना श्रद्धांजली.
आनंद भाटे, सुप्रसिद्ध गायक